महाबळेश्वरचा सेंद्रिय मध खातोय ‘भाव’ | पुढारी

महाबळेश्वरचा सेंद्रिय मध खातोय ‘भाव’

सातारा; प्रवीण शिंगटे :  मधाचा अस्सल गावरान ब्रँड सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येच उपलब्ध असून येथील सेंद्रिय मधाने कार्पोरेट बाजारपेठ मिळवली आहे. महाबळेश्वरच्या या गुणकारी मधाला आता मागणी वाढत चालली आहे. त्याला चांगला दरही मिळू लागला आहे. सेंद्रिय मध, सातेरी मध, मेलिफेरा मध तसेच त्यातून मिळणार्‍या मेणाची खरेदी खादी व ग्रामोद्योग मंडळ हमीभावाने करत आहे. या खरेदीच्या हमीभावात वाढ केली असून हा सेंद्रिय मध भलताच ‘भाव’ खाऊ लागला आहे.

56 गावांमध्ये सेंद्रिय मधाचा प्रकल्प

जागतिक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेल्या महाबळेश्वरला आता मधामुळे आणखी नवी ओळख प्राप्त झाली आहे. डोंगररांगांच्या कुशीत महाबळेश्वजवळील मांघर गाव देशातील पहिले मधाचे गाव ओळखले जाते. हाच पॅटर्न आता राज्यभर राबवला जात आहे. त्यासाठी राज्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने सन 2014 मध्ये सेंद्रिय मध प्रकल्पाची सुरुवात केली. सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर या दोन तालुक्यांतील 23 गावांची तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांतील 33 गावांची निवड करण्यात आली. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला.

जांभूळ मधाला मधुमेह रुग्णांकडून मोठी मागणी

– मार्च एप्रिलमध्ये मिळणार्‍या जांभूळ या मधात पाण्याचे प्रमाण कमी असते. साखर 0.5 ते 0 टक्क्यापर्यंत असते. हा मध चवीला तुरट लागतो. यामुळे मधुमेह रुग्णांकडून या मधाला जास्त मागणी आहे.
–  आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय व खादी ग्रामोद्योगने या जांभूळ मधावर प्रयोग केला. जांभूळ मधाचे सेवण ज्या रुग्णांनी केले आहे, त्यांना फायदा झाला असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. सूर्यफूल व ओवा या मधावरही प्रयोग सुरू आहेत, याबाबत लवकरच निष्कर्ष जाहीर होतील.
– जांभूळ व गेळा झाडांना मेमध्ये फुलोरा येत असून त्याचा मध गोड, पारदर्शक पिवळसर असतो. पारंपरिक माहितीनुसार हा मध ब्रेनटॉनिक म्हणून वापरला जातो.

हाडांच्या बळकटीकरणासाठी पिसा मध

  • पिसा मध हा डिसेंबरमध्ये मिळतो. खनीज द्रव्य मुबलक असल्यामुळे हा मध स्नायूला बळकटी देतो. आखरा मध हा एप्रिलमध्ये मिळतो. परंतु हा मध दर 4 वर्षांनंतर एकदा मिळतो हा हाडांच्या बळकटीकरणासाठी फायदेशीर असल्याने मधाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते.

8 वर्षांतून एकदाच मिळतोय कारवी मध

कारवी या मधात जीवनसत्त्वे, क्षार, पोषणमूल्ये जास्त असल्याने 8 वर्षांतून एकदा मिळत असल्याने त्याला मागणी जास्त आहे. व्हायटी कारवी ही वनस्पती आठ वर्षांनंतर फुलत असल्याने त्याच्या मधासाठी लोक वाट बघत असतात.

मधाच्या उत्पादनात दुप्पट वाढ

स सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व वाई तालुक्यातील 146 लाभार्थी सेंद्रिय मध प्रक्रियेशी मंडळासोबत जोडलेली आहेत. या प्रक्रियेत सेंद्रिय मध संकलकांना मंडळाने सेंद्रिय मधसंकलन अद्ययावत प्रशिक्षण दिले आहे. सुरुवातीच्या कालावधीत वर्षाला प्रतिमधपेटी 4 ते 8 किलो उत्पादन मिळत होते. परंतु, सेंद्रिय मधाचे गाव जाहीर केल्यानंतर मधपाळ शेतकर्‍यांमध्ये उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मधपाळांना मधाचा जास्त भाव मिळायला लागला. त्यामुळे प्रत्येक पेटीचे मध उत्पादन हे आता 10 ते 15 किलोंपर्यंत वाढले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मधपाळ शेतकरी घेत आहेत.

सेंद्रिय मधाची खरेदी मंडळामार्फत त्यांच्या मधपाळ शेतकर्‍यांच्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन करत आहे. ही देशातील एकमेव शासकीय यंत्रणा असून मधपाळ शेतकर्‍यांच्या मधाला देशात जादा दर दिला जात आहे. मधपाळ शेतकर्‍यांची आर्थिक वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे.
– दिग्विजय पाटील, संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य

Back to top button