सातारा पालिका करणार 26 हजार युनिट वीजनिर्मिती; दरवर्षी 6 कोटींची बचत | पुढारी

सातारा पालिका करणार 26 हजार युनिट वीजनिर्मिती; दरवर्षी 6 कोटींची बचत

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा नगरपालिका सोनगाव कचरा डेपो येथे साकारण्यात येणार्‍या सौरऊर्जा प्रकल्पातून सुमारे 6 हजार युनिट तर कास धरणातून येणार्‍या जलवाहिन्यांवर 20 हजार युनिट विजेची निर्मिती करणार आहे. दोन्ही प्रकल्पांतून सुमारे 26 हजार युनिट वीज तयार होणार आहे. या विजेचा वापर कास व शहापूर पाणीयोजना, शहरातील स्ट्रीटलाईट व न.पा. कार्यालयासाठी होणार आहे. वीजबिलापोटी वर्षाचा होणारा सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांचा खर्च वाचणार असून शिल्लक वीजेपासून कोट्यवधींचे उत्पन्न नगरपालिकेला मिळणार आहे.

सातारा नगरपालिका ही हद्दीबाहेर मालमत्ता असणारी राज्यातील एकमेव नगरपालिका आहे. कास धरण, सोनगाव कचरा डेपो आणि आकाशवाणी झोपडपट्टी, करंजे एमआयडीसी (सध्या हद्दीत) या नगरपालिकेच्या मोठ्या मालमत्ता आहेत. नगरपालिकेने या मालमत्तांचा वापर उत्पन्नवाढीसाठी करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. आता या मालमत्तांवर उत्पन्नवाढीच्यादृष्टीने आणि नगरपालिकेच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने नवे प्रयोग प्रशासनाकडून सुरु आहेत. सातारा नगरपालिकेने सोनगाव कचरा डेपो येथील घनकचरा प्रकल्पाच्या छतावर सोलर पॅनल बसवून सुमारे 6 हजार युनिट विजनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सौरऊर्जेवर चालणार्‍या एफएसटीपी प्लांटची उभारणी भविष्यात करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.

सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. कास धरणाची उंची वाढवण्यात आली असून धरणात यावर्षीपासून शंभर टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नगरपालिकेने तब्बल 95 कोटी रुपये खर्च केले. सध्या या धरणात 0.5 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कास धरणातून गुरूत्वाकर्षनाद्वारे सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांपर्यंत पाणी आणले जाते. वेग प्रचंड असल्याने या पाण्यावर पॉवर हाऊस येथे पूर्वी जलविद्युत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला होता. मात्र तो कालांतराने बंद पडला. आता पुन्हा हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा चंग नगरपालिकेने बांधला आहे. या प्रकल्पातून सुमारे 20 हजार युनिट विजनिर्मिती करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. दोन वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होतील. नगरपालिकेकडून सुमारे 26 युनिट वीजनिर्मिती केली जाणार आहे. नगरपालिकेच्या पाणीयोजना, कार्यालय कामकाज व स्ट्रीटलाईट यांच्यासाठी सुमारे 17 हजार 100 युनिटची आवश्यकता असते. ही गरज भागल्याने नगरपालिकेचा सुमारे 5 ते 6 कोटींचा विजबिलावर होणारा खर्च वाचणार आहे. तसेच 8 हजार 900 युनिट शिल्लक वीजेतून नगरपालिकेला लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

नगरपालिकेचे खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे हीच प्रशासनाची भूमिका आहे. सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पाची देखभाल नियमित ठेवण्याकडे लक्ष दिले जाईल. सातारा शहरासाठी भविष्यात आणखी असे प्रकल्प राबवले जातील. सातारा शहर अग्रेसर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
-अभिजीत बापट, मुख्याधिकारी, सातारा

Back to top button