राजधानी साताऱ्यात शिवजयंतीचा माहोल; ऐतिहासिक शिवतीर्थ परिसराला विद्युत रोषणाई | पुढारी

राजधानी साताऱ्यात शिवजयंतीचा माहोल; ऐतिहासिक शिवतीर्थ परिसराला विद्युत रोषणाई

सातारा: पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत असून राजधानी साताऱ्यासह जिल्ह्यात त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. साताऱ्यातील ऐतिहासिक शिवतीर्थ परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला आहे. चौकाचौकात व प्रमुख मार्गावर भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी कमानीही उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, साताऱ्यासह जिल्ह्यात शिवप्रतिमा, भगवे झेंडे, फेटे, टोप्या आदिंच्या रेलचेलीने बाजारपेठाही भगव्या झाल्या असून जिल्ह्यात शिवजयंतीचाच माहोल तयार झाला आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. मागील दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे साधेपणाने सण समारंभ साजरे झाले. मात्र, यावर्षी तब्बल दोन वर्षांनी मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होणार असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साह दुणावला आहे. शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळेही सरसावली आहेत. स्वागत कमानी उभारणे, पोस्टर लावणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आदि कामांची लगबग आता पूर्णत्वाकडे गेली आहे. सातारा शहरातही ठिकठिकाणी कमानी उभारण्यात येत आहेत. शिवप्रेमींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स लावली जात आहेत.

शिवजयंतीच्या पूर्वतयारीमुळे राजधानी साताऱ्यासह जिल्ह्यात शिवजयंतीचा माहोल निर्माण झाला आहे. शिवजयंतीसाठी विविध गडकिल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठी मावळे सज्ज झाले असून शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. शिवजयंतीनिमित्त गडावर ट्रेकिंगचे बेतही आखले जात आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विक्रीस आलेल्या विविध साहित्यामुळे बाजारपेठही शिवमय होवून गेली आहे. सातारा शहरासह परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी विविध आकारातील शिवप्रतिमा, शिवमुद्रा असलेले भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या टोप्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत.

स्पर्धांबरोबरच विधायक उपक्रमांचेही आयोजन

यावर्षी सर्वत्रच शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याने विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, विविध उपक्रमांचे • नियोजन करण्यात येत आहे. शिवजयंती उत्सव मंडळांकडून विविध स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. तरुणाईकडून गडभ्रमंती, गडकिल्ले स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर असे विधायक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

Back to top button