सातारा : दोन मुलांचा खून करणार्‍या पित्याला जन्मठेप | पुढारी

सातारा : दोन मुलांचा खून करणार्‍या पित्याला जन्मठेप

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  आपल्या पश्चात पत्नी आपल्या मुलांचा सांभाळ करणार नाही, असे वाटल्याने मुलगी गौरवी (वय 11) हिचे डोके रस्त्यावर आपटून तर मुलगा प्रतीक (वय 7) याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी चंद्रकांत अशोक मोहिते (वय 40, रा. घाटकोपर, मुंबई) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी ही शिक्षा दिली आहे. महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीत 2019 साली ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 9 ऑक्टोबर 2019 साली ही घटना घडली होती. चंद्रकांत मोहिते हा दोन्ही मुलांना कारमध्ये घेवून घाटकोपर, मुंबई येथून निरा नदीवरील रस्ता ओलांडून खंडाळा हद्दीतील कॅप्सूल कंपनी परिसरात आला. यावेळी दोन्ही मुलांचा खून केला. यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारच्या डीकीत ठेवून कारमधून निघाला होता. त्यावेळी मोहिते खंडाळा पोलिसांना सापडला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोनि उमेश हजारे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षीरसागर, फेरोज शेख, गौरी लकडे यांनी बाजू मांडून युक्तिवाद केला. या खटल्यात साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. यावरुन आरोपी अशोक मोहिते याला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Back to top button