सातारा : प्रदूषणमुक्तीच्या हाकेला यंदा तरी मिळणार का साद? | पुढारी

सातारा : प्रदूषणमुक्तीच्या हाकेला यंदा तरी मिळणार का साद?

सातारा; मीना शिंदे :  प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीचा सण साजरा होत असल्याने दिव्यांबरोबरच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे लाखो रुपयांचा फटाक्याच्या माध्यमातून धूर निघतो. त्यातून हवा, ध्वनी प्रदूूूूूूूषण मोठ्या प्रमाणावर होत असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अनेक वर्षांपासून शासनासह सामाजिक स्तरावर जनजागृती केली जात आहे. कोरोनाने पोळलेल्या नागरिकांकडून आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत प्रदुषणमुक्तीच्या हाकेला साद मिळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा ही उक्ती अगदी चपखल बसते. दिपोत्सव साजरा करताना उत्साह आणि आनंदाला उधाण आले आहे. हा आनंद फटाक्यांची आतिषबाजी करुन साजारा करण्याची परंपरा जोपासली जात आहे. मात्र संशोधन आणि वैज्ञानिक क्रांतीबरोबरच फटाका उद्योगातही क्रांती झाली आहे. जास्ती जास्त आवाज, जास्त प्रकाश देणारे विविध टप्प्यावर फुटणारे फटाके बाजारपेठेत येत आहेत. पारंपारिक फटाक्यांमध्ये अ‍ॅल्युमिनियम, बॅरीयम, पोटॅशियम, नायट्रेट आणि कार्बन या घटकांचा वापर केला जातो. हे घटक पर्यावरण व मानवी आरोग्यास हानीकारक ठरत आहेत. काही क्षणांच्या आनंदासाठी फोडल्या जाणार्‍या फटाक्यातून लाखो रुपयांचा धूर निघत आहे. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी, वायू प्रदूषण होत आहे.

दरवर्षीच दिवाळीच्या कालावधीत हवेत प्रदुषणाचा टक्का वाढतो. या प्रदुषणाने श्वसन विकारांमध्ये वाढ होत आहे. फटाक्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून शासनासह सामाजिक स्तरावर जनजागृती केली जात आहे. तरी देखील मागील वर्षापर्यंत प्रदुषणमुक्तीला हरताळ फासत फटाके फोडले जात होते. कोरोनाने पोळलेल्या नागरिकांकडून आरोग्याला प्राधान्य दिले जावू लागले आहे. यावर्षी देखील शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली जात असल्याने बजारपेठेतही पर्यावरणपूरकतेचा बोलबाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत प्रदुषणमुक्तीच्या हाकेला साद मिळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

नॉईज लेवल लिमीट नोंदीचा अभाव

फटाक्यांची निर्मिती करणार्‍या कारखान्यांनी शासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार नॉईज लेव्हल लिमीट म्हणजेच कोणता फटाका किती आवाज करतो, याची नोंद त्याफटाक्याच्या प्रत्येक बॉक्स किंवा पाकिटावर लिहिणे आवश्यक आहे. मात्र सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बहुतांश फटाक्यांच्या पॅकिंगवर नॉईज लेव्हल लिमीट नोंदीचा अभाव आढळून येत आहे. नागरिकांनी फटाके खरेदी करताना कमी आवाजाच्या फटाक्यांनाच प्राधान्य देणे आवश्यक आहे.

पर्यावरणपूरक फटाक्यांची गरज
बहुतेक शहरांमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये धुराचे साम्राज्य निर्माण होत असल्याने 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. हे फटाके पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत कार्बनडाय ऑक्साईड अत्यंत कमी प्रमाणात सोडतात. तसेच या फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा 125 डेसिबलच्या आतच असते. पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करण्यात येत असली तरी बाजारपेठेत हे फटाके कमी प्रमाणात दिसत आहेत.

Back to top button