सातारा : पालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड 40 हजारांचे अनुदान खात्यावर | पुढारी

सातारा : पालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड 40 हजारांचे अनुदान खात्यावर

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा नगरपालिकेतील कर्मचारी तसेच अधिकार्‍यांना अ‍ॅडव्हान्स, सानुग्रह अनुदान, महागाई फरक याची संवर्गानुसार 35 ते 40 हजारांची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून ही ‘दिवाळी भेट’ असल्याची भावना कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये आहे. पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम मिळाल्याने यावेळी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

सातारा नगरपालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी दरवर्षी केली जाते. नगरपालिकेत सर्वमिळून सुमारे 462 अधिकारी तसेच कर्मचारी आहेत. कर्मचारी तसेच अधिकार्‍यांच्या
मागणीचा विचार करुन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी संवर्गानुसार सुमारे 12 हजार 500 अ‍ॅडव्हान्स, सुमारे 17 हजार सानुग्रह अनुदान, सुमारे 8 ते 9 हजार महागाई भत्ता फरक असे सुमारे 37 हजार ते 40 हजार रुपये एका कर्मचार्‍याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल आरती नांगरे यांनी ही कार्यवाही केली आहे. कर्मचार्‍यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनोखी भेट मिळाली. त्यांची यावर्षीची दिवाळी आणखी गोड होणार आहे. कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या रक्कमांमुळे नगरपालिकेवर लाखो रुपयांचा बोजा पडला आहे.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची तत्परता

दिवाळीसाठी बोनस मिळावा यासाठी नगरपालिका कर्मचार्‍यांना संघर्ष करावा लागला आहे. निवेदने देवून, आंदोलने करुन 10 हजार ते 15 हजारापर्यंतच सानुग्रह अनुदान दिले जायचे. त्यासाठी पदाधिकार्‍यांच्या नाकदुर्‍या काढाव्या लागल्या होत्या. मुदत संपल्यामुळे यावर्षी प्रशासक नियुक्त झाले. त्यामुळे यावर्षी संघर्ष न करता कर्मचारी, अधिकार्‍यांना घसघशीत बोनस मिळाला. कर्मचार्‍यांच्या दिवाळीपूर्वी अडचणी लक्षात घेवून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्परता दाखवल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button