सातारा : धरणात साडेसात महिन्यांसाठी पुरेसा साठा; सिंचन, वीजनिर्मितीची चिंता मिटली | पुढारी

सातारा : धरणात साडेसात महिन्यांसाठी पुरेसा साठा; सिंचन, वीजनिर्मितीची चिंता मिटली

पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  जून ते सप्टेंबर हा पावसाचा तांत्रिक हंगाम संपूनही अद्यापही पडत असलेल्या पावसामुळे आत्तापर्यंत धरणात तब्बल 146.36 टीएमसी पाण्याची आवक झाली. यापैकी पश्चिम वीजनिर्मिती, सिंचन, विनावापर आदी 60.14 टीएमसी पाण्यानंतरही 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 104.93 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळातील सिंचन व वीजनिर्मितीची चिंताच नाही.

एक जूनपासून सुरु होणार्‍या धरणाच्या तांत्रिक नव्या वर्षांंरंभालाही येथे अपेक्षित पाणी शिल्लक राहणार असून अतिरिक्त पाणीवापर होऊन ज्यादा वीजनिर्मितीसाठी हा मुबलक पाणीसाठा फायदेशीरच ठरणार आहे. या अतिरिक्त पाणी वापरासाठी शासन, प्रशासनानेही सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे.

गतवर्षी जुलैमध्ये कोयना धरणासह पाटण तालुक्यात नैसर्गिक हाहाकार माजला होता. कमी काळात सर्वाधिक पावसाचे शंभर वर्षातील विक्रम मोडीत निघाले आणि कधीही भरून येणार नाही अशी मोठ्या प्रमाणावर जीवित व अब्जावधींची वैयक्तिक, सार्वत्रिक वित्तहानी झाली. नैसर्गिक आपत्तींमध्ये महापूर, भूस्खलनात अभूतपूर्व अशी जीवित व वित्तहानी झाली. वर्षभरात राज्यातील वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयनेतून अतिरिक्त पाणीवापर झाला. अखंडित वीजनिर्मितीसाठी कमालीचा पाणीवापर झाल्याने चालू वर्षारंभाला अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला.

सुरुवातीला अपुर्‍या पावसामुळे जून महिन्यात धरणात केवळ एक टीएमसीच पाणी आवक झाली. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ते चालू ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक सुरुच आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत धरणात 146.36 टीएमसी पाण्याची आवक झाली. यावर्षी आत्तापर्यंत पश्चिम वीजनिर्मितीसाठी 17.76, पुर्वेकडे सिंचन 4.27, पूरकाळात 7.11, विनावापर 30.29, आपत्कालीन दरवाजातून 0.71 अशा एकूण 60.14 टीएमसी पाण्यानंतरही 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात आगामी आठ महिन्यांसाठी तब्बल 104.93 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी आरक्षित आहे. वर्षभरात पूर्वेकडे सिंचनासाठी सरासरी 30 ते 35 टीएमसी पाण्याची गरज भासते. निश्चितच लवादाचा आरक्षीत कोटा, सिंचन व वेळप्रसंगी गतवर्षी प्रमाणे ऐनवेळी वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त पाणीवापर करण्याच्या दृष्टीनेही कोयना धरण सर्वच बाजूंनी भक्कम झाल्याचे या स्पष्ट होत आहे.

महापूर रोखण्यात व्यवस्थापन यशस्वी…

कोयना धरणांतर्गत विभागात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची आवक तुलनात्मक कमी होऊनही निसर्गाची साथ व धरण व्यवस्थापनाचा तांत्रिक नियोजनात्मक कारभार लक्षात घेता सध्या ज्यादा पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी पूर्वेकडे पूर अथवा महापूर रोखण्यात कोयना धरण व्यवस्थापन यशस्वी झाले आहे.

Back to top button