Lok Sabha Election : दिल्लीतील लढत ठरवणार विधानसभेची दिशा | पुढारी

Lok Sabha Election : दिल्लीतील लढत ठरवणार विधानसभेची दिशा

प्रशांत वाघाये (दिल्ली)

देशात लोकसभा निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत. राजधानी दिल्लीत सर्व सातही मतदार संघांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे. राजधानीत भाजप विरुद्ध काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यात भाजपचे मनोज तिवारी वगळता दोन्ही बाजूंनी उमेदवारी देताना नव्या चेहर्‍यांवर डाव खेळला आहे. या निवडणुकीत भाजपच्या बासुरी स्वराज आणि काँग्रेसचे कन्हैयाकुमार हे लक्षवेधी चेहरे आहेत.

पुढच्या वर्षी राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी (एनडीए आणि इंडिया) लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर दिल्लीत लोकसभा ज्या पक्षाने जिंकली, त्याच पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले, असे वक्तव्य दिल्लीतील नागरीक सहज बोलताना करत असतात, हे उल्लेखनीय!

देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या तेव्हा आणि राजधानी दिल्लीतील मतदान तोंडावर आले आहे तेव्हाच्या परिस्थितीमध्ये मोठा फरक आहे. दरम्यानच्या काळात ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात जावे लागले. अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यामुळे अरविंद केजरीवालांना भाजपने आणि केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करून तुरुंगात डांबले, अशी आरोपांची धार आक्रमकपणे सुरू ठेवली. त्यामुळे केजरीवालांना सहानुभूतीही मिळाली.

काही दिवसांनी केजरीवालांना अंतरिम जामीन मिळाला. त्यामुळे आधीच्या सहानुभूतीसह आम आदमी पक्षामध्ये आणि एकूणच इंडिया आघाडीमध्ये उत्साह संचारला. मात्र, त्यानंतर घडलेल्या स्वाती मालिवाल प्रकरणाने या उत्साहाला ब्रेक लावल्याचे चित्र आहे. आधीच दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणावरून भाजपने रान उठवले आहे. प्रत्येक सभेत, प्रत्येक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात सामान्य दिल्लीकरांना लुटले, हे भाजपने सांगितले. भाजप यावरच जोरदर देत असताना स्वाती मालिवाल प्रकरणामुळे केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या विरोधात आयते कोलीत सापडले.

दुसरीकडे इंडिया आघाडीचाच भाग असलेल्या काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंह लवली यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. काल-परवापर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले लवली भाजपसाठी मत मागत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही बाजूंनी नेत्यांची फौज प्रचारात उतरवली जात आहे.

राजधानी दिल्लीत एनडीएसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जवळजवळ सर्व भाजपशासित (मित्रपक्षांसह) राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, प्रमुख नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या, रोड शो केले. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमधील काँग्रेस आणि ‘आप’च्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, सुनीता केजरीवाल, खासदार संजय सिंह, ‘आप’च्या नेत्या आणि मंत्री अतिशी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातपैकी सात जागा जिंकल्या होत्या. दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, राजधानी दिल्लीत राहतात. अनेक महत्त्वाची कार्यालये, संस्था दिल्लीत आहेत. अनेक अर्थाने दिल्ली महत्त्वाची आहे. त्यामुळे पुन्हा दिल्ली जिंकणे हा भाजपचा प्रयत्न असणार आहे. 2014 पासून केंद्रासह विविध राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात यश मिळाले. ज्या राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळू शकत नाही, असे भाष्य राजकीय क्षेत्रातील जाणकार करत होते, त्यांनाही भाजपने आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने तोंडघशी पाडले आणि सत्ता मिळवून दाखवली. त्यामुळे देशात सर्वत्र चाललेला करिष्मा पुन्हा दिल्ली लोकसभेत चालणार, असा विश्वास भाजपला आहे.

तर इंडिया आघाडीचा एकत्रित करिष्मा तारुन नेईल, असा विश्वास ‘आप’ आणि काँग्रेसला आहे. देशाप्रमाणेच दिल्ली विधानसभेत भाजपसाठी राम मंदिर, कलम 370 तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राजधानी दिल्लीत केलेली विविध विकास कामे, शहरी भागात दिलेल्या सुविधा हे मुद्दे प्रचारात दिसले, तर आम आदमी पक्षाकडून दहा वर्षांत दिलेली मोफत वीज, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्याच्या सुविधा, केजरीवालांच्या 10 गॅरंटी आणि काँग्रेसकडून संपुआ सरकारच्या काळात आणि शीला दीक्षित यांच्या काळात केलेली विकास कामे, काँग्रेसचे 5 न्याय आणि 25 गॅरंटी या मुद्द्यांवर प्रचार करण्यात आला.

‘आप’ आणि काँग्रेसने केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो, विरोधकांना जाणीवपूर्वक तुरुंगात टाकले जाते, भाजप पुन्हा सरकारमध्ये आल्यास संविधान बदलणार, हेही मुद्दे चांगलेच गाजवले. मात्र, या सगळ्यांमध्ये भाजपकडून सुरुवातीला दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण आणि त्यानंतर स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण, तर इंडिया आघाडीकडून तपास यंत्रणांचा गैरवापर, विरोधकांना जाणीवपूर्वक तुरुंगात टाकले जाते, भाजप संविधान बदलणार, हे मुद्दा चांगलेच गाजले. मात्र, या सर्व मुद्द्यांवरून सामान्य जनतेची मते कोणाच्या बाजूने वळतात किंवा या मुद्द्यावरून कोणाला मते मिळतात आणि कुणाच्या विरोधात जातात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आपली बाजू जनतेला पटवून देण्यात जे यशस्वी ठरतील, ते लोकसभेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

असे आहे दिल्लीतील लोकसभा लढतीचे चित्र

लोकसभा मतदारसंघ                  भाजप उमेदवार                इंडिया आघाडीचे उमेदवार
चांदणी चौक                          प्रवीण खंडेलवाल               जे. पी. अग्रवाल (काँग्रेस)
उत्तर पूर्व दिल्ली                      मनोज तिवारी                  कन्हैयाकुमार (काँग्रेस)
उत्तर पश्चिम दिल्ली                 योगेंद्र चंदोलिया                 उदित राज (काँग्रेस)
पूर्व दिल्ली                           हर्ष मल्होत्रा                     कुलदीप कुमार (आप)
नवी दिल्ली                         बांसुरी स्वराज                    सोमनाथ भारती (आप)
पश्चिम दिल्ली                       कमलजीत सेहरावत             महाबल मिश्रा (आप)
दक्षिण दिल्ली                        रामवीर सिंग बिधुरी              साही राम (आप)

Back to top button