सव्वातीन लाख जनता पाण्यासाठी तहानलेली | पुढारी

सव्वातीन लाख जनता पाण्यासाठी तहानलेली

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दररोज कुठेना कुठे वळीव हजेरी लावत असला तरी टंचाईची स्थिती काही कमी होत नाही. दुष्काळामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून सव्वातीन लाख जनता पाण्यासाठी तहानली आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठीही दाहीदिशा भटकंती सुरु आहे. चारा आणि पाणीही वेळेत मिळत नसल्याने दोन लाख जनावरे हंबरडा फोडत आहेत. माळराने काळवंडली असल्याने चार्‍याच्या शोधात शेतकरीही भटकू लागला आहे.

जिल्ह्यात दर चार-पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. 2018 साली जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट होते. त्यावेळी अनेक गावांत जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो पशुधन छावण्यात होते. त्याचठिकाणी शेतकर्‍यांनीही संसार थाटलेला. त्यानंतर आता दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 65 टक्के पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस कमी राहिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने वाई, खंडाळा या संपूर्ण तालुक्याबरोबरच इतर 60 हून अधिक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, दुष्काळाच्या सवलती किती प्रमाणात लागू झाल्या याविषयी आजही शेतकर्‍यांना प्रश्न पडला आहे. सध्या तर जिल्ह्यात पाणी आणि चार्‍याचा मोठा गहन प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे.

माणमध्ये 105 गावे आहेत. त्यातील 71 गावे आणि 437 वाड्यावस्त्यांवर टंचाईच्या झळा आहेत. या गावातील 1 लाख 24 हजार 623 लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. 1 लाख 19 हजार 715 पशुधनही टँकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या 85 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातही टंचाईची भीषणता वाढली आहे. 52 गावे आणि 145 वाडीवस्त्यांवर टँकरची चाके फिरु लागली आहेत. 39 टँकरने 81 हजार 384 नागरिकांना आणि 19 हजार 642 जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही दुष्काळाची चिंता आहे. सध्या 40 गावे आणि 99 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर सुमारे 64 हजार नागरिक आणि 37 हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. या भागातील 33 गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या 26 टँकरने 42 हजार नागरिक आणि 24 हजार 656 जनावरांना पाणी देण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील दोन गावांत टंचाई आहे. त्यासाठी एक टँकर सुरु असून 1 हजार 330 नागरिक आणि 159 पशुधनाला आधार मिळाला आहे. वाई तालुक्यात 6 गावे आणि 5 वाड्यांना, तर पाटणमधील 2 गावे तसेच 8 वाड्यांसाठी टँकर सुरु आहे. कराड तालुक्यातही 7 गावांतील 5 हजार नागरिक आणि 3 हजार जनावरांना 4 टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

पशुधनाला 199 टँकरने पाणीपुरवठा…

  • जिल्ह्यात 2018 प्रमाणचे टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सध्या 213 गावे आणि 694 वाडीवस्त्यांत टंचाईची झळ पोहोचली आहे. एकूण 3 लाख 27 हजार 556 नागरिक आणि 2 लाख 10 हजार 202 पशुधनाला 199 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
  • माण तालुका 75 टक्के टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक गावांतून टँकरला मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आणखी टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्याही वाढणार आहे.

Back to top button