सातारा : बुरख्यात ‘गडी’ लव्हरला भेटायला गेला, अन् चोप खाल्ला! | पुढारी

सातारा : बुरख्यात ‘गडी’ लव्हरला भेटायला गेला, अन् चोप खाल्ला!

सातारा : पुढारी वृत्तसेवा : वेळ शुक्रवार सकाळची… तामजाईनगर परिसरात बूट, जीन्स घालून एक पठ्ठ्या बुरख्यात वावरू लागला… पाहता पाहता पोरं चोरणारी टोळी आल्याचा संशय काही नागरिकांच्या मनात आला… सारा मामला संशयास्पद ओपन झाल्याने आग्गा, पिच्छा न पाहता जमावाने त्याला चोप दिला… ही बाब शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी ताब्यात घेतले… चौकशीत गडी लव्हरला भेटायला बुरख्याच्या वेशात गेल्याचे समोर आले.

त्याचे झाले असे, शुक्रवारी तामजाईनगर परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. एकीकडे शाळेमध्ये जाणारी-येणारी पोरं येत होती. स्कूल बस, रिक्षाचा वावर होता. दुसरीकडे मात्र एकजण संशयास्पदरीत्या फिरत होता. बुरखा घातलेली महिला वरून वाटणारी ती पुरुषासारखी चालत असल्याचे काही महिलांनी हेरले. एका इमारत परिसरात बराचवेळ बुरखाधारी रेंगाळत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांच्या मनात शंकाकुशंकाचे मोहोळ उठले. पोरांची शाळा परिसरात असल्याने अखेर काही नागरिकांनी बुरखाधारी व्यक्तीला घेरले. तोपर्यंत याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. आपण घेरलो गेल्याचे बुरखाधारीच्या लक्षात येताच त्याने पळायचा प्रयत्न केला आणि ‘बुरखा फाटला !’ बुरख्यात पुरुष असल्याचे पाहून जमाव संतप्त बनला व त्याला तुडवायला सुरुवात केली. या घटनेने परिसरात बघ्यांची गर्दी झाली.

बुरखाधारी गड्यावर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. प्रश्न ऐकून बुरखाधार्‍याचे ‘त त फ फ’ झाले. काय सांगावे अन् काय सांगू नये, हे त्याला उपजेना. बुरखाधारी बोलत नसल्याचे पाहून जमाव एकएक चापट देत होता. तोपर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्याची फौज घटनास्थळी दाखल झाली. जमावाला शांततेचे आवाहन करुन संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी बुरखारी व्यक्तीला बोलते केले असता तो मूळचा वाई तालुक्यातला असल्याचे समोर आले. कशाला आला होता व बुरख्याची भानगड विचारताच तो बोलता झाला. बुरखाधार्‍याने दिलेले उत्तर ऐकूण पोलिसांनी कपाळावर हात मारला. घटनास्थळी अब्रूचे खोबरे होवू नये यासाठी बुरखाधार्‍यानेच मला पोलिस ठाण्यात घेवून चला, असा पाढा लावला.पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून सायंकाळपर्यंत त्याचा बायोडाटा काढत कुंडली काढली. मी लव्हरला भेटायला आलो होतो म्हणून बुरखा घातल्याचे त्याने सांगितले. रात्री उशीरापर्यंत पोलिस संशयिताकडे सर्व बाजू गृहीत धरुन चौकशी करत होते.

Back to top button