सातारा : ‘सुकन्या समृद्धी’चे लाभार्थी लाखावर | पुढारी

सातारा : ‘सुकन्या समृद्धी’चे लाभार्थी लाखावर

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. खास करून लेकीची. यामुळेच मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना सध्या लोकप्रिय ठरत असून, जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत सुमारे 85 हजारांवर लाभार्थी झाले असून लवकरच लाखाचा टप्पा ओलांडला जाणार आहे. या योजनेमुळे एक प्रकारे लेकीला बळ येत असून, पालकांची जबाबदारी काहीशी सुसह्य होत आहे.

काय आहे योजना?

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे, हे खाते तुम्ही तुमच्या दोन मुलींच्या नावे उघडू शकता. शून्य ते दहा वर्षे पूर्ण करण्यापूर्वी हे खाते उघडले जाऊ शकते. प्रारंभी अवघ्या 250 रुपयांत खातं उघडता येते. हे खाते अन्य खात्यांप्रमाणे मुदतपूर्व बंद करता येत नाही. त्यामुळे थोडी थोडी बचत करून मुलींच्या भविष्यांतील शिक्षण, तसेच व्यवसाय, लग्न अशा महत्त्वाच्या वेळी आर्थिक हातभार लागणार आहे. त्यामुळे बचतीचा उद्देश सफल होणार आहे.

* भारतीय डाक विभागाच्या खेडोपाडी, तसेच शहरी भागाच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून या योजनेसाठी पोस्टमन तसेच पोस्ट कर्मचारी जनजागृती करीत नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत. या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला अवघ्या 250 रुपयांमध्ये तुम्ही खाते उघडू शकता. दरम्यान, ‘सुकन्याचे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा’या प्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे.

* लाडक्या मुलीच्या भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी अगदी कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा देणारी ही सरकारी योजना आहे. या योजनेत करबचतीचाही लाभ मिळतो. सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारी ही योजना मुलीच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे.

ही आहेत आवश्यक कागदपत्रे…

खातं उघडण्यासाठी जन्माचा दाखला, मुलगी, आई-वडील यांचे ओळखपत्र, आधार, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वाहन परवाना यापैकी एक द्यावे लागते, तसेच दोन फोटो. पत्ता आणि त्याचा पुराव्यासाठी पासपोर्ट, वीज बिल, फोन बिल, रेशन कार्ड, सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज भरताना आवश्यक आहे.

वर्षाला 7.6 टक्के व्याज…

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा 7.6 टक्के असून, या योजनेत दरमहा 3 हजार रुपये गुंतविले तर वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक होईल. 14 वर्षांनी 7.6 टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 9 लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. 21 वर्षांनी मुदत संपल्यानंतर तब्बल 15 लाख 22 हजार 221 रुपये मिळतील.

पाच वर्षांतील आकडेवारी…

मार्च 2016 पर्यंत 12 हजार 354 जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. 2016 ते 17 या वर्षात 34 हजार 105, 2017 ते 18 या वर्षात 39 हजार 387, 2018 ते 19 या वर्षांमध्ये 43 हजार 485, 2019 ते 20 यामध्ये 48 हजार 633, 2020 ते 21 मध्ये 58 हजार 286 तर 2021 ते 22 मध्ये 83 हजार 852 जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियनांतर्गत सरकारने ही अल्पबचत योजना सुरू केली. सर्वाधिक व्याजदर असणारी ही अल्पबचत योजना आहे.

Back to top button