‘कोयने’त 480 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती | पुढारी

‘कोयने’त 480 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

पाटण ः गणेशचंद्र पिसाळ यावर्षी जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळी हंगाम व कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षारंभाला अपेक्षित पाऊस नसल्याने सिंचनापेक्षाही वीजनिर्मितीबाबत सार्वत्रिक चिंता वाटत होती. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांच्या पहिल्या पंधरवड्यात धरणांतर्गत विभागात अपेक्षित पाऊस व सिंचन व वीजनिर्मितीसाठी मुबलक पाणीसाठा झाल्याने आता आगामी काळातील वीजनिर्मितीची चिंता मिटली आहे. पहिल्या टप्प्यात पाण्याअभावी वीजनिर्मितीवर आलेल्या मर्यादाही आता संपुष्टात आल्या असून तांत्रिक वर्षाच्या पहिल्या अडीच महिन्यांत येथे 480 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात 16 ऑगस्टपर्यंत चार वीजनिर्मिती प्रकल्पातून 479.920 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ पाणीवापर ज्यादा झाला असून परिणामी 3.444 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे. उर्वरित साडेनऊ महिन्यांसाठी पाणीवाटप लवादाचा 57.74 टीएमसी आरक्षित पाणी कोटा शिल्लक असल्याने आगामी काळात सुरळीत व अखंडित वीजनिर्मिती शक्य असल्याचे या तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

16 ऑगस्ट अखेर धरणाच्या चार जलविद्युत प्रकल्पातून आत्तापर्यंत 479.920 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 3.444 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिमेकडे 9.76 टी.एम.सी. पाण्यावर 452.653 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी आत्तापर्यंत 9.32 टी.एम.सी. वर 445.904 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती . तुलनात्मक यावर्षी पश्चिमेकडे 0.44 टी.एम.सी. पाणीवापर ज्यादा झाल्याने परिणामी 6.749 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे.

पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. आत्तापर्यंत सिंचन 4.26 व पुरकाळात 3.35 अशा एकूण 7.61 टी.एम.सी. पाण्यावर 27.267 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचन व पुरकाळात सोडलेल्या 6.77 टी.एम.सी. पाण्यावर 30.572 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.तुलनात्मक यावर्षी 0.84 टी. एम. सी. पाणीवापर ज्यादा झाला असला तरी परिणामी 3.305 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे . गतवर्षी अतिरिक्त पाणीवापर झाल्याने ऐन उन्हाळ्यातील संकट लक्षात घेऊन शासनाने पश्चिमेला अतिरिक्त 15 टीएमसी वापरायला परवानगी दिली होती. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच गतवर्षी 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले. गेल्या काही वर्षात सिंचनासाठी सरासरी 35 टीएमसी पाणी पाण्याची गरज भासते सुदैवाने गतवर्षी 21.70 टीएमसी मध्येच सिंचनाची गरज भागल्याने त्याचा अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी फायदा झाला. एकूणच पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणी वाटप लवादाचा आरक्षित 67.50 टीएमटी पैकी उर्वरित साडेनऊ महिन्यांसाठी 57.74 टीएमसी आरक्षित पाणी शिल्लक असल्याने यावर आगामी काळात सुरळीत वीजनिर्मिती शक्य आहे .

जादा वीजनिर्मिती

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता यावर्षी एकूण 17.37 टीएमसी पाण्यावर 479.920 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 16.09 टीएमसी पाण्यावर 476.476 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 1.28 टीएमसी पाणीवापर ज्यादा व 3.444 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.

अडीच महिन्यांत 480 दशलक्ष
युनिट वीजनिर्मिती
वीज निर्मितीसाठी अपेक्षित
पाणीसाठा चिंता मिटली
गतवर्षीच्या तुलनेत जादा वीजनिर्मिती
पूर्व, पश्चिम प्रकल्पांसाठी 17.37 टीएमसी पाणी वापर
पश्चिम वीजनिर्मिती आरक्षित 57.74 टीएमसी कोटा शिल्लक

Back to top button