सातारा : कोयनेचे आज वक्री दरवाजे उचलणार? | पुढारी

सातारा : कोयनेचे आज वक्री दरवाजे उचलणार?

पाटण; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच असून, धरणातील पाणीसाठ्यात गुरुवार सायंकाळपर्यंच्या 24 तासांत 4.76 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. त्यामुळेच पाणीसाठा 85.21 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर पावसाचा जोर वाढल्यास शुक्रवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे 1 फूट 6 इंचाने उचलले जाणार असून, धरणातून प्रतिसेकंद 8 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार असल्याची शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आली आहे.

पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे कोयना धरणात गुरूवारी सायंकाळी 5 वाजता छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधब्यातून प्रतिसेकंद सरासरी 55,447 क्युसेक पाण्याची आवक होत होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी 5 ते शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात धरणातील पाणी उंचीत 6.8 फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळेच गुरूवारी दुपारी 3 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहात दोन्ही जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटणसह कराड तालुक्यात पडणारा पाऊस आणि धरणातून सुरू करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.

गुरूवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासात कोयना येथे 208 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे 115 मिलिमीटर व महाबळेश्वरमध्ये 174 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 80.21 टीएमसी इतका असून पाणी उंची 2147 फूट इतकी झाली होती. तर धरणातील जल पातळी 654.406 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 20.04 टीएमसी पाण्याची गरज आहे.

Back to top button