सातारा : यावर्षी 90 टक्के जागांवरच अकरावी प्रवेश | पुढारी

सातारा : यावर्षी 90 टक्के जागांवरच अकरावी प्रवेश

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  अकरावी प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजला असून राज्यबोर्ड वगळता अन्य बोर्डाचा निकाल जाहीर न झाल्याने यावर्षी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 10 टक्के जागा इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवून प्रवेश क्षमतेच्या 90 टक्के जागांवरच प्रवेश द्यावेत. क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिल्यास कारवाई होणार असून प्रवेश प्रक्रिया राबवताना संविधानिक व समांतर आरक्षणाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिल्या.

अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्रतिनिधींसाठी आयोजित कार्यशाळेत शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, शिक्षण विस्ताराधिकारी साईनाथ वालेकर, डाएटचे किरण शिंदे, वायसीचे उपप्राचार्य एन. टी. निकम यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी 38 हजार असून प्रवेश क्षमता 51 हजार 880 एवढी आहे. त्यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी. अनुदानित तुकडीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच विनाअनुदानित तुकडीसाठी प्रवेश द्यावेत. पारदर्शकतेने प्रवेश प्रक्रिया राबवावी. शासन निर्णयानुसारच फी आकारणी करावी. फी निश्‍चितीसाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना करुन पहिल्या बैठकीतच फी वाढीचा ठराव संमत करावा. शासनाच्या गाईडलाईन नुसारच गुणवत्ता यादी तयार करावी.एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रोव्हीजन प्रवेश द्यावेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षण विभागाच्या लिंकवर प्रवेशितांची माहिती भरावी, अशा सूचनाही कोळेकर यांनी दिल्या.

भरारी पथकांचा वॉच.
पालक व विद्यार्थ्यांचा काही ठराविक महाविद्यालयांकडेच जास्त ओढा राहत असल्याने अकरावी प्रवेशामध्ये चुरस वाढत आहे. विशेषत: शहरी भागात विद्यार्थी व पालकांच्या आग्रहामुळेच महाविद्यालयांकडून वाढीव तुकडी व प्रवेशांची मागणी केली जाते. त्याचा परिणाम इतर महाविद्यालयातील अनुदानित तुकड्यांमधील प्रवेश रोडवतात. या पार्श्‍वभूमीवर प्रवेश प्रक्रियेवर भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. भरारी पथकाव्दारे अचानक भेटी देवून अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घातला जाणार आहे.

 

Back to top button