MLA P N Patil : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी. एन. पाटील अनंतात विलीन | पुढारी

 MLA P N Patil : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी. एन. पाटील अनंतात विलीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांच्या पार्थिवावर गुरुवारी सडोली खालसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोल्हापुरवर शोककळा पसरली. सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव ११ वाजता सडोली येथे नेण्यात आले. दुपारी १ वाजता त्यांच्यावक  अंत्यसंस्कार करण्यात आले. पी. एन. पाटील (MLA P N Patil) रविवारी (दि. १९) सकाळी निवासस्थानी बाथरूममध्ये तोल जाऊन पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मुंबई व  कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली होती. गेल्या आठवडाभरापासून त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता.

आमदार पी. एन. पाटील यांचा राजकीय प्रवास

  • आ. पी. एन. पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कोलहापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदापासून केली.
  • आमदार पी. एन. पाटील यांनी विधानसभेच्या सहा निवडणुका लढवल्या.
  • पहिल्या तीन निवडणुका शेकापचे संपतराव पवार यांच्याविरूद्ध झाल्या.२००४ च्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील सांगरूळ विधानसभा मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार झाले होते.
  • २००९ व २०१४ च्या निवडणूकीत आमदार पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
  • काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पी. एन. पाटील यांनी अत्यंत सक्षमपणे चालवून पक्षाला जिल्ह्यात उभारी दिली.

पी. एन. पाटील आणि निष्ठा यांचे अतूट नाते

पी. एन. पाटील आणि निष्ठा यांचे अतूट नाते आहे. चाळीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कधीही आपल्या तत्त्व व निष्ठेशी तडजोड केली नाही. काँग्रेस पक्ष आणि गांधी-नेहरू घराणे त्यांच्या नसानसात भिनलेले आहे. राजकीय कारकीर्दीत अनेकदा अपयश पत्करावे लागले. मात्र, त्यांनी कधीही पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही. १९९९ साली काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले. तेव्हा जिल्ह्यात पक्षाची अवस्था गलितगात्र झाली होती. मात्र, सलग वीस वर्षे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. जिल्हाध्यक्षपदाची धुरा प्रदीर्घकाळ सांभाळणारे देशातील एकमेव नेते आहेत. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याला ताकद देऊन संघटना मजबूत करण्याचे आणि टिकवण्याचे काम त्यांनी केले. राजकारण हे केवळ राजकारणासाठी अथवा फायद्यासाठी न करता सर्वसामान्य जनतेचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेले पी. एन. पाटील म्हणजे राज्याच्या राजकारणातील एक तपस्वीच होते.

कर्जमाफीची विधिमंडळात मागणी करणारे पी. एन. पाटील एकमेव व पहिले आमदार

आमदार पाटील (MLA P N Patil) यांनी चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत. केवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित न जोपासता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी राज्य शासनाला अनेक धोरणात्मक निर्णय घ्यायला लावले. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे शेतकरी कर्जमाफी व शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय होय. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत त्यांनी शेतकरी विकासासाठी अत्यंत आग्रही भूमिका घेतली. दहा-बारा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची विधिमंडळात मागणी करणारे पी. एन. पाटील हे एकमेव व पहिले आमदार होते. त्यानंतर केंद्र शासनाने ७२ हजार कोटींची व राज्य शासनाने साडेसहा हजार कोटींची जी कर्जमाफी दिली, त्या पाठीमागे त्यांचा पाठपुरावाच कारणीभूत होता.

हेही वाचा

Back to top button