चाकणला अनधिकृत होर्डिंगवर कारवाई; लोखंडी सांगाडे हटवले | पुढारी

चाकणला अनधिकृत होर्डिंगवर कारवाई; लोखंडी सांगाडे हटवले

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चीद्रवार यांच्या आदेशाने चाकण नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंगविरोधात मंगळवारी (दि. 21) कारवाई सुरू केली. नगरपालिका हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गावरील मोठे अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आले आहेत. चाकण नगरपालिकेने सर्वच बेकायदेशीर होर्डिंगधारकांना नोटीस दिल्या होत्या. तातडीने बेकायदा होर्डिंग काढून घ्या अन्यथा नगरपालिका असे सर्व होर्डिंग स्वतः काढणार असल्याची तंबी सर्वच बेकायदेशीर होर्डिंगधारकांना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली होती.

नगरपालिकेने दिलेल्या मुदतीत संबंधित होर्डिंग हटले नाहीत. त्यामुळे आता नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन कारवाई सुरू केली आहे. पोलिस बंदोबस्तात अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम मंगळवारी सकाळपासून सुरू केली. चाकण-तळेगाव चौक भागातील लोखंडी होर्डिंग हटवण्यात आले. दरम्यान, नगरपालिकेच्या वतीने अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, चाकणमधील तळेगाव चौकालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेले लोखंडी होर्डिंगचे सांगाडे मात्र अजूनही धोकादायक स्थितीत उभे आहेत. त्यावर कोण आणि कधी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनधिकृत होर्डिंग उभारणार्‍यांना 60 जणांना नोटीस

चाकण नगरपालिकेच्या वतीने हद्दीतील 60 अनधिकृत होर्डिंग उभारणार्‍यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यातील सुमारे 25 जणांनी स्टेबिलिटी सर्टिफिकेट नगरपालिकेला दिली आहेत. मात्र त्या प्रमाणपत्रांची खात्री नगरपालिकेकडून केली जात आहे. सर्वच धोकादायक होर्डिंग हटवण्याची तयारी नगरपालिकेने केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button