पिंंपळनेर : ब्राम्हणवेल येथे मारहाणीत तरुणाचा मृत्यू; खूनाचा गुन्हा दाखल | पुढारी

पिंंपळनेर : ब्राम्हणवेल येथे मारहाणीत तरुणाचा मृत्यू; खूनाचा गुन्हा दाखल

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा – मोटरसायकलची धडक दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात बेदम मारहाण करुन तरुणाचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल गावात घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फौजफाटा दाखल झाला होता. यासंदर्भात, गणेश राजु माळचे (20) रा. ठाणेपाडा ता.जि. नंदुरबार) याने निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो ब्राम्हणवेल येथे दुर्गा मातेच्या यात्रेसाठी आला होता. बुधवार (दि.२२) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गणेश व त्याचा चुलत मामा गोरख हिम्मत मोरे (22) रा. जामकी ता.साक्री),याच्यासोबत ब्राम्हणवेल यात्रेतून जामकी येथे जाण्यासाठी गोरख मोरे याची मोटरसायकल (जीजे 5/डीएस 7971) ने निघाले. ब्राम्हणवेल फाट्यावर ब्राम्हणवेलकडे जाणाऱ्या मोटारसायकल (एमएच 18/सीबी-3882) वरील व्यक्तीने समोरुन त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेमुळे गणेश व गोरख हे दोघे मोटरसायकलवरुन खाली पडले. तेव्हा गोरख याने त्यास मोटरसायकलला धडक दिल्याबाबत जाब विचारला. मात्र,याचा राग आल्याने संबंधिताने गोरख यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. गणेश हा गोरख यास सोडविण्यासाठी गेला असता गोरख हा गणेशच्या अंगावर कोसळला. त्यानंतरही तो व्यक्ती गोरख यास मारहाण करीत होता. यात्रेतून ये-जा करणाऱ्या लोकांनी संबंधितास समजविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यास सागर तू एमएसईबीमध्ये काम करणारा असून समजदार आहेस, विनाकारण त्यास का मारहाण ‌करीत आहे, असे लोक सांगत असतांनाही त्याने मारहाण सुरुच ठेवली.

सागर विलास नांद्रे (रा.ब्राम्हणवेल),असे त्याचे नाव असल्याचे लोकांकडून समजले. मारहाणीत गंभीर गोरखच्या नातेवाईकांसह जखमी झालेला गोरख यास लोकांच्या मदतीने बाम्हणवेल येथे उपचारासाठी नेले. तेथून त्यास रुग्णवाहिकेने जैताणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून गोरख मोरे यास मृत घोषीत केले आहे. संशयित सागर नांद्रे याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालयात ग्रामस्थांनी केली गर्दी

क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण करुन गोरखचा खून केल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने यावेळी तणाव निर्माण झाला होता. तसेच निजामपूर पोलीस ठाण्याच्या आवारातही गर्दी होती. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळासह निजामपूर पोलीस ठाण्यास भेट दिली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button