खूनप्रकरण: पोलिस काढणार मुंबईच्या खाडीतून बंदूक | पुढारी

खूनप्रकरण: पोलिस काढणार मुंबईच्या खाडीतून बंदूक

सातारा;पुढारी वृत्तसेवा: सातारा शहरातील नटराज मंदिर परिसरात भरदिवसा अर्जुन यादव ऊर्फ राणा (रा. वाई) या युवकाच्या खून प्रकरणातील बंदूक संशयितांनी मुंबईच्या खाडीत फेकून दिल्याची कबुली दिल्यानंतर मंगळवारी शहर पोलिस तपासासाठी गेले. दिवसभर तपास सुरू राहिल्याने नेमकी माहिती समोर आली नसून बंदूक सापडणार का? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्‍त केली आहे.अर्जुन यादव याचा दि. 2 जुलै रोजी दुपारी सातार्‍यात फायर करून खून झाला आहे. खूनप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यातील अभिजीत मोरे ऊर्फ भैया व सोन्या शिंदे (दोघे रा. वाई) हे पोलिस कोठडीत असून उर्वरित संशयित अल्पवयीन आहेत. गँगवॉरमधून खून झाल्याचे समोर आल्यानंतर संशयितांना एलसीबी पथकाने पकडले व पुढील तपासासाठी शहर पोलिसांकडे वर्ग केले. गेली पाच दिवस संशयितांकडे शहर पोलिस चौकशी करत आहेत. मात्र, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वगळता अद्यापपर्यंत पोलिसांच्याहाती विशेष काही सापडलेले नाही.

ज्या बंदूकीतून फायरिंग झाले तेच अद्याप पोलिस जप्‍त करु शकले नाहीत. यामुळे थंड डोक्यानेच राणाची हत्या केल्याचे अधोरेखित होत आहे. पोलिसांचा तपास सुरु असताना बंदूकीबाबत संशयितांनी ती परराज्यातून आणल्याचे समोर येत आहे. मात्र ते कोणाकडून घेतले? कोणी घेतले? किती रुपयांना विकत घेतले? आतापर्यंत ते कोणाकोणाकडे होते? बंदूक चालवण्याचे ट्रेनिंग कोणी दिले? फायरिंगचा डेमो झाला आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.

Back to top button