जागतिक लोकसंख्या दिन विशेष : साताऱ्यात मुला-मुलींचे प्रमाण समानतेपर्यंत | पुढारी

जागतिक लोकसंख्या दिन विशेष : साताऱ्यात मुला-मुलींचे प्रमाण समानतेपर्यंत

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 31 लाख 3 हजार 741 इतकी असली तरी गेल्या 10 वर्षांत यामध्ये मोठी भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचा टक्का वाढताना दिसत आहे. सन 2020 मध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण 930 होते तर तेच प्रमाण सन 2021 मध्ये 941 झाले आहे. नव्याने होणार्‍या जनगणनेत मुलींचा जन्मदर वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसणार आहे. मुले व मुलींचा जन्मदर पाहिला तर या लोकसंख्येत दोन्हीचे प्रमाण समानतेपर्यंत येवू लागल्याचे संकेत आहेत.

फलटण तालुक्यातील प्रमाण चिंतेचे, जावलीतील प्रमाणही नऊशेच्या आतच

पुरूष प्रधान संस्कृतीमध्ये मुलींचा जन्मदर कमी असतानाच जिल्ह्यात दुष्काळी माण, खटाव व वाई तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर वाढला आहे. या तालुक्यात मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे. 1 हजार मुलांच्यामागे मुलींचे प्रमाण माण तालुक्यात 1 हजार 82, खटाव तालुक्यात 1 हजार 74, वाई 1 हजार 6, कराड 996, कोरेगाव 990, महाबळेश्वर 969, पाटण 956, खंडाळा 939, सातारा 934, जावली 868. फलटण तालुक्यातील प्रमाण मात्र चितेंचे आहे. या तालुक्यात 1 हजार मुले जन्म घेत असतील तेव्हा 726 मुली जन्म घेत असल्याचे आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी सांगते.

लोकसंख्या रोखण्यासाठी उपाययोजना

गर्भधारणा टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 72 प्राथमिक आरोग्य केंद्र व 400 उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात केली जात आहे. गर्भनिरोधक गोळ्या व तांबी यांचा वापर केला जात आहे. तसेच अंतरा इंजेक्शनचा गर्भधारणा टाळण्यासाठी वापर केला जात आहे.

11 हजार 267 महिलांनी घेतला लाभ

सन 2020 मध्ये सुमारे 14 हजार 426 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर सन 2021 मध्ये 7 हजार 964 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर सन 2022 मध्ये 11 हजार 267 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा लाभ घेतला आहे. स्त्रीयांच्या तुलनेत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

जागतिक लोकसंख्या स्थिरता पंधरवडा…

राष्ट्रीय कुटुंंब कल्याण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी जागतिक लोकसंख्या स्थिरता पंधरवडा दि. 11 ते 24 जुलै अखेर राबवण्यात येत आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळण्या एवढापुरता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचा आहे. जिल्ह्यामध्ये खाजगी शस्त्रक्रिया करणारे सर्जन यांची जिल्हा गुणवत्ता अभिवचन समितीने मान्यता दिलेल्या खाजगी व्यावसायिकांना पंधरवड्यादरम्यान कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये मदत करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवाहन केले जाते.

नव्या जनगणनेत कामगार वर्गाची पडणार भर …

प्रत्येक वर्षी11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जात असतो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. रोजगारांच्या संधी निर्माण होण्यासह शैक्षणिक सुविधाही तितक्याच गरजेच्या असतात. त्याचअनुषंगाने रोजगाराच्या शोधात बाहेरील राज्यातील नागरिकांचा सातारा जिल्ह्यातील अनेक शहराकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण या तालुक्यासह शिरवळ, पाचगणी, पुसेगाव, म्हसवड, दहिवडी या शहरामध्ये परराज्यातील व परजिल्ह्यातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने विसावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाढलेल्या कामगार वर्गाची नव्या जनगणनेत भर पडली जाणार आहे.

जनजागृतीवर दिला जातोय भर…

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयाच्या माध्यमातून त्या-त्या गावांमध्ये स्वीकारा कुटुंब नियोजनाचा उपाय, लिहा प्रगतीचा नवा अध्याय, छोटे कुटुंब : सुखी कुटुंब अशी मानसिकता तयार करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. कुटुंब नियोजन सेवाबाबत जिल्हास्तरावरुन कॅलेंडर तयार करुन त्याचे वाटप केले जात आहे. कुटुंब नियोजन प्रदर्शन, सेवा, सुविधा याबाबत माहितीपत्रके वाटली जात आहेत. कुटुंब आरोग्य मेळाव्याचे आयोजन, नसबंदी शस्त्रक्रिया, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

Back to top button