श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा ; फलटण शहरात विठ्ठल भक्‍तीचा गजर | पुढारी

श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा ; फलटण शहरात विठ्ठल भक्‍तीचा गजर

फलटण : अजय माळवे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे फलटण शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फूर्तीचा, उत्सव माऊलींच्या विठ्ठलभक्‍तीचा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. अवघी श्रीरामनगरी माऊलीमय झाली आहे. वैष्णवांचा मेळा फलटण विमानतळ येथे असलेल्या पालखी तळावर विसावला आहे.

पंढरीस जाऊ । रखुमादेवी वरा पाहू ॥ डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥ संता महंता होतील भेटी । आनंदे नाचो वाळवंटी ॥ ते तीर्थांचे माहेर । सर्व सुखांचे भांडार ॥ जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक ॥

तुकोबारायांच्या अभंगातील या ओळींप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम….तुकाराम’सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा शुक्रवारी महानुभाव व जैन पंथीयांची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या ऐतिहासिक फलटणनगरीत मुक्कामासाठी विसावला आहे. तरडगाव येथील पालखी तळावरून सकाळी 6 वाजता सोहळ्याच्या प्रस्थानानंतर सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेऊन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठलभक्‍तांसमवेत सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला.

टाळ-मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठ्ठल दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सद‍्गुरू हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आल्यानंतर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी विसावला. वारीत सहभागी असलेल्या लाखो वारकर्‍यांसह शहर व तालुक्यातील नागरीकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरतीनंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणकरांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. फलटण शहरातील ऐतिहासिक राम मंदिर व जबरेश्‍वर मंदिर येथेही दर्शनासाठी वारकरी व महिलांनी रांगा लावल्या होत्या.

पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फुर्तीचा, उत्सव माऊलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण झाले आहे. पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकर्‍यांचे सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन सुरु होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका यामुळे अवघे फलटण शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकानी मोफत चहा व बिस्किटे, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय तसेच मोफत आरोग्य सेवा, मोबाईल फोन चार्ज करुन देणे आदी उपक्रम वारकर्‍यांसाठी सुरु होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

वारकर्‍यांना पाण्याची अडचण येवू नये या करता नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने आंघोळ व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली होती. वारकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात आले होते. पालखी तळावर व शहरात ठिकठिकाणी फिरती शौचालये व स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. वारकर्‍यांच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखी तळावर नगरपालिकेच्यावतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आला आहे. पालखीतळावर लाखो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती झाल्यानंतर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी फलटण शहर व तालुक्यासह शेजारील तालुक्यातील भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, पालखी मुक्कामाच्या कालावधीत विविध सहकारी व सामाजिक संस्था व मंडाळांच्यावतीने वारकर्‍यांच्या सेवेसाठी उपक्रम राबवले जात आहेत. सद्यस्थितीत समस्त फलटणनगरी माऊलीमय झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच वारीतील वारकर्‍यांची सेवा आपल्यापरीने करण्यास प्रत्येक नागरीक प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button