ओव्हरटेकच्या नादात पत्नीचा मृत्यू | पुढारी

ओव्हरटेकच्या नादात पत्नीचा मृत्यू

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा दुचाकीवरून जाताना झालेल्या अपघातात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खंबाटकी घाटात घडली. घाटामध्ये शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकीची बसला धडक बसली. या अपघातात पतीही गंभीर जखमी झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हँडल धडकल्याने ही दुर्घटना घडली.

या अपघातात सविता संभाजी चव्हाण (वय 50, रा. कोरे धावडे, पुणे) यांचा मृत्यू झाला; तर पती संभाजी चव्हाण (वय 60) हे गंभीर जखमी झाले आहेत. बस चालक महेंद्र जालिंदर जाधव (रा. अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली) हे बस (एमएच 13 सीयू 8138) घेऊन पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघाले होते. तर संभाजी गुलाब चव्हाण व पत्नी सविता संभाजी चव्हाण (दोघेही रा. कोडे धावडे, जि. पुणे) हे दुचाकी (एमएच 12 ईडी 8360) वरून सातारा बाजूकडे निघाले होते. दोन्ही वाहने खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळील वळणावर आली
असता संभाजी चव्हाण यांनी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीचा हँडल बसला धडकल्याने पती-पत्नी दोघेही रस्त्यावर पडले.

यामध्ये सविता चव्हाण यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संभाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले. उपचारााठी त्यांना सातारा येथे हलवण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा

Back to top button