

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले : शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्याने सेनेतील निष्ठावंत आणि गद्दार असे दोन गट तयार झाले असून गद्दारांची हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसे झाल्यास कोल्हापुरातील शहर प्रमुख व भुदरगड तालुक्यातील सेना पदाधिकार्यांमध्ये बदलाची शक्यता आहे.
शिवसेनेतील बंडखोरीने शिवसैनिक नाराज आहेत. पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोर्चे काढले. पक्ष आहे म्हणून पद, प्रतिष्ठा आहे, असे शिवसैनिक सांगत आहेत. सेनेत जिल्हापातळीवर जिल्हा प्रमुख तसेच शहरप्रमुख व महिला आघाडीच्या प्रमुखांना विशेष महत्त्व आहे. कोल्हापूर शहरात शिवसेना एकसंघ असतानाही दोन गट कार्यरत होते. एक राजेश क्षीरसागर गट व संजय पवार गट. संपर्कप्रमुख व संपर्क नेत्यांसमोर दोघांमधील वाद उफाळून आला होता. त्यामुळे कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने, आंदोलने झाली तर ती कोणत्या गटाची अशी विचारणा होत होती.
गेल्या दोन वर्षांत शहरप्रमुख पद नेमताना क्षीरसागर यांनी आपल्या गटातील शिवसैनिकाला प्राधान्य दिले. यापूर्वी नेमलेल्या दुर्गेश लिंग्रस व रविकिरण इंगवले यांचेही क्षीरसागर यांच्याशी फारसे पटले नाही. मनपा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने संजय पवार गटाने शिवसेना नगरसेवकाच्या घरावर हल्ला केला होता. या सर्व घटनाक्रम शिवसैनिकांच्या डोळ्यासमोर उभा राहू लागला आहे.
शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या आ. प्रकाश आबिटकर व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना पदे दिली आहेत. शिंदे गटातील नेते अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत, असे सांगतात. पण तळागाळातील कार्यकर्ता हे मान्य करायला तयार नाही.
पक्षाशी प्रामाणिक तो निष्ठावंत आहे. त्यामुळे कोल्हापूरचे शहरप्रमुख व भुदरगड मधील शिवसेना पदाधिकारी नेमके कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गद्दार शिवसैनिकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुखांनी केली आहे. तसे झाल्यास जिल्हा व शहरात पदाधिकारी बदलाची शक्यता आहे.