सातारा : चांदोबाचा लिंब येथे रंगला माउलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा | पुढारी

सातारा : चांदोबाचा लिंब येथे रंगला माउलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण आज (दि.३०) दुपारी चारच्या सुमारास चांदोबाचा लिंब येथे पार पडले. आळंदी-पंढरपूर वारीतील विशेष महत्त्‍व असलेला रिंगण सोहळा या वर्षी वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद व्दिगुणीत करणारा ठरला. एक नवी ऊर्जा यातून वारकऱ्यांना पुढील वारीसाठी मिळाली.

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे हा सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यंदा रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी सोहळ्यात झाली होती. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांची गर्दी याठिकाणी झाली असल्याने प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी केली होती. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रिंगण कालावधीत सोहळ्यातील वाहनांना वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

वारकऱ्यांचा उत्साह आणि टाळ मृदुंगाच्या टिपेला पोहचलेल्या स्वरात रिंगण पार पडले. माउली…माउली…आणि ग्यानबा…तुकाराम…च्या जयघोष वारकऱ्यांनी वारीतील पहिले उभे रिंगण पाहताना आध्यात्मिक मेजवानीचा आनंद लुटला. भक्ती, शिस्त आणि अनुशासनाचा मूर्तीमंत सोहळा या रिंगणावेळी अनुभवायला मिळला. माउलींचा पालखी सोहळा लोणंद येथे मंगळवारी सायंकाळपासून अडीच दिवसांसाठी विसावला होता. गुरुवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माउलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. दुपारी दोनच्या सुमारास पालखी खंडाळा तालुक्याचा निरोप घेऊन सरदेच्या ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश केला. केवळ आठ किलोमीटरचे सर्वांत छोटे अंतर असलेला हा टप्पा आहे.

चांदोबाचा लिंब याठिकाणी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. मंदिराचे रंगरंगोटी करून फुलांची सजावट करण्यात आली होती. चांदोबाचा लिंब परिसरात माउलींचा चांदीचा रथ पोहोचल्यावर सर्व दिंड्या आहे, त्या जागी थांबविण्यात आल्या. सर्व दिंड्यातील वारकऱ्यांनी दोन्ही बाजूने उभे राहत रिंगणासाठी माउलींचा जयघोष सुरू केला.

चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळ्यापुढे असणारे दोन अश्व. ज्यात एकावर स्वत: माउली स्वार असतात व तर दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा घोडा ज्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. चोपदारांनी दंड उंचावून इशारा दिल्यावर या दोन अश्वांनी वेगाने धाव घेत दिंड्यांच्या पुढील टोकाला गेले आणि पुन्हा माउलींच्या रथापर्यंत आले. अन् पहिले उभे रिंगण पार पडले. रिंगणावेळी अग्रभागी व शेवटच्या टोकाच्या संपर्कासाठी चोपदारांनी वॉकी टॉकीचा वापर केला. चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण पार झाल्याचे जाहीर केले. दोन्ही अश्वांना चांदीच्या रथापुढे आल्यावर पेढ्यांचा प्रसाद भरवला गेला. आणि एकच अलोट गर्दी उसळली, ती अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी.

यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेराने येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू झाला होता. अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी रिंगण संपल्यावर तरडगावच्या मुक्कामासाठी सरसावले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button