औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या घेतलेल्या निर्णयास विरोध सुरु झाला असून हा निर्णय राजकीय असल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर विरोधी कृती समिती या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन करत लोकशाही मार्गाने न्यायालयातही जाणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहेमद यांनी सांगितले.
यासंदर्भात कृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल आदी पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुश्ताक अहेमद म्हणाले की, मुळात नामांतराचा हा निर्णय अल्पमतातील सरकारला घेता येत नाही, नामांतराचा यापूर्वीही निर्णय घेण्यात आला होता, त्यास सुप्रीम कोर्टात हे प्रकरण बंद झाल्यामुळे सरकारने नामांतराचा पुन्हा निर्णय घेणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान ठरतो. या निर्णयामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामागे राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. देशात न्याय असेल, तर सर्वसामान्यांना न्याय मिळेल असेही मुश्ताक अहमद यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबादच्या नावाला ३५० वर्षांचा इतिहास आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर आहे. ज्या शहराला नावाचा इतिहास नाही अशा शहराला नावे देण्यात यावी असेही यावेळी मुश्ताक अहमद यांनी सांगितले.
संभाजीनगर नावाच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय? पक्षातूनही राजीनामे देणार काय? यावर मुश्ताक अहेमद म्हणाले की, काही लोकांनी राजीनामे दिले असतील ती त्यांची लढाई आहे. आम्ही पक्षात राहून लढाई लढणार असून पक्षाने आम्हाला बाहेर काढावे असेही मुश्ताक अहमद यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?