सातारा : झेडपी प्रभाग रचनेचा चेंडू आयुक्तांकडे | पुढारी

सातारा : झेडपी प्रभाग रचनेचा चेंडू आयुक्तांकडे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सुमारे 100 हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, 27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद गट व गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या आराखड्यावर आयुक्त स्तरावर कामकाज पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची तपासणी करताना भौगोलिक स्तर, गावे, लोकसंख्या पाहण्यात आली. त्यानंतर 31 मे रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्याला मान्यता दिली. त्यामुळे 2 जून रोजी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली.

या प्रभाग रचनेवर दि. 8 जूनपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी खंडाळा तालुक्यातून 11, फलटण 5, खटाव 11, कोरेगाव 1, वाई 21, जावली 1, सातारा 20, पाटण 9, कराड 21 अशा मिळून 100 हरकती दाखल झाल्या. तर माण, महाबळेश्वर या तालुक्यातून एकही हरकत दाखल झाली नाही. या हरकतींवर सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी पार पडली.

एकाच दिवशी सर्व हरकतींवर सुनावण्या पूर्ण झाल्या. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी किती हरकती फेटाळल्या. किती हरकतींवर निकाला देवून गट व गणात बदल करण्यात आला हे लवकरच समजणार असले तरी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील इच्छुकांसह राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

विभागीय आयुक्त हे प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी देवून निवडणूक विभाग, निर्वाचक गण रचना अंतिम निर्णय दि. 22 जूनपर्यंत देणार आहेत.दि. 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नवीन प्रभाग रचनेनुसार 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मिनीमंत्रालयात आता 73 सदस्य निवडून येणार आहेत. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button