सातारा : पालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर 59 हरकती | पुढारी

सातारा : पालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर 59 हरकती

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर सर्व मिळून 59 हरकती दाखल झाल्या आहेत. मेढा नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेवर एक सुचना दाखल झाली आहे. या सुचना व हरकतींवर दि. 19 व 20 रोजी प्रभारी जिल्हाधिकरी विनय गौडा यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिका तसेच मेढा नगरपंचायत यांची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. निवडणुकीची तारीख केव्हाही जाहीर होवू शकते, यादृष्टीने नगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेवर सुचना व हरकती मागवल्या असताना शासनाने तो कार्यक्रम स्थगित केला होता. आता प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम स्थगित केलेल्या टप्प्यापासून राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा सुरु केला. त्यामध्ये सुचना व हरकती दाखल करण्याची मुदत दि. 17 पर्यंत होती. नगरपालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर जिल्ह्यातून 59 हरकती दाखल झाल्या आहेत.

त्यामध्ये सातारा सर्वाधिक 25, रहिमतपूर व फलटण प्रत्येकी 8, कराड 5, वाई 7, महाबळेश्‍वर 4, पाचगणी 2 तर म्हसवडमधून एकही हरकत आली नाही. तर प्रारुप प्रभाग रचनेवर मेढा नगरपंचायतीसाठी एक सुचना आली आहे. सुचना व हरकतींवर दि. 30 रोजीपर्यंत सुनावणी घेण्याची मुदत आहे. त्याअनुषंगाने सातारा व कराड नगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 30 हरकतींवर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे. तर, फलटण, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड पालिका व मेढा नगरपंचायतीतून दाखल झालेल्या 30 हरकतींवर दि. 20 रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

या सुनावणीच्या अनुषंगाने संबंधित तक्रारदारांना सुनावणीवेळी उपस्थित राहण्यासंदर्भात त्या-त्या मुख्याधिकार्‍यांनी कळवले आहे. सुनावणीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर सातारा, फलटण व कराड नगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला तर म्हसवड, रहिमतपूर, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी पालिका व मेढा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेचा अहवाल पुणे महसूल विभागीय आयुक्‍तांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button