दोन हजार वर्षांचा इतिहास जपणारी कोल्हापुरातील संग्रहालये... | पुढारी

दोन हजार वर्षांचा इतिहास जपणारी कोल्हापुरातील संग्रहालये...

कोल्हापूर; सागर यादव : प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तब्बल दोन हजार वर्षांच्या इतिहासाचे जतन, संवर्धन व संरक्षण करणारी विविध वस्तू संग्रहालये ‘शाहूनगरी’ कोल्हापुरात एकवटली आहेत. किंबहुना या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांनी कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली आहे. टाऊन हॉल वस्तू संग्रहालय, छत्रपती शहाजी म्युझियम, शाहू जन्मस्थळ संग्रहालय, चंद्रकांत मांडरे कला दालन या संग्रहालयांमधून हा अनमोल ठेवा गेल्या 75 वर्षांपासून जपण्यात आला आहे.

राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस)
कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त 1974 साली या वास्तूला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. 3 मार्च 1977 पासून राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत या वास्तूचा समावेश झाला. या वास्तूत राजर्षी शाहूंच्या कार्याचा आढावा घेणार्‍या गोष्टींचा समावेश आहे. विविध विभागात शाहूंची चित्रे, छायाचित्रे, कार्याची माहिती देणारी छोटी छोटी स्मारके, म्यूरल्स, ग्रंथालय आदींचा यात समावेश आहे.

चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. चंद्रकांत मांडरे यांच्या निसर्ग चित्राच्या आवडीतून निर्माण झालेले हे संग्रहालय. स्वत: काढलेल्या व जमविलेल्या शेकडो चित्रांची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने मांडरे यांनी राजारामपुरी येथील आपले राहते घर चित्रसंग्रहासाठी शासनाला दिले. पुरातत्त्व विभाग व वस्तू संग्रहालय विभागाने या ठिकाणी चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय सुरू केले. 10 मार्च 1987 रोजी याचे उद्घाटन झाले. छायाचित्र दालन, पावडर शेडिंग दालन, चित्रकला दालन 1 व 2 अशा एकूण चार विभागांत संग्रहालय विभागले आहे.

सिद्धगिरी संग्रहालय कणेरी मठ
कणेरी मठ (ता. करवीर) येथे अलीकडच्या काही वर्षांत सिद्धगिरी वस्तू संग्रहालय उभारण्यात आले आहे. कृषिप्रधान ग्रामीण जीवनशैली आणि बारा बलुतेदार समाजावर प्रकाशझोत टाकणार्‍या या वस्तू संग्रहालयात भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये असणारी संत परंपरा, धार्मिक व सामाजिक विविधता एकवटली आहे.

कोल्हापूर वस्तू संग्रहालय (टाऊन हॉल म्युझियम)

1945-46 या कालावधीत कोल्हापुरातील ब्रह्मपुरी टेकडी परिसर उत्खननात सापडलेल्या वस्तू ठेवण्यासाठी संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. 30 जानेवारी 1946 रोजी कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. 1949 मध्ये टाऊन हॉल उद्यानातील कोल्हापूर नगर मंदिर (टाऊन हॉल) येथे हे वस्तू संग्रहालय सुरू झाले. ही वास्तू इसवी सन 1872 ते 76 या कालावधीत रॉयल इंजिनिअर सी मॉट यांच्या देखरेखीखाली गॉथिक वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आली. संग्रहालयात इ.स. 200 ते इ.स.पूर्व 200 या कालावधीतील म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीच्या समुद्र देवता, रोमन पदक, प्राचीन काळी कोल्हापूरचा जगभराशी असणार्‍या व्यापार संबंधांची माहिती देणारा नकाशा (समुद्र मार्ग), प्राचीन हिंदू-जैन धर्मातील देवतांच्या मूर्ती, विविध कालावधीतील शस्त्रास्त्रे, शिल्पाकृती आदी ऐतिहासिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे.

न्यू पॅलेस म्युझियम (नवा राजवाडा संग्रहालय)

छत्रपतींचा स्फूर्तिदायी वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याच्या स्मृती अखंड राहाव्यात या उद्देशाने छत्रपती शहाजी महाराजांनी नव्या राजवाड्यात शहाजी छत्रपती म्युझियमची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्म शताब्दीनिमित्त 30 जून 1974 रोजी सौ. प्रमिलाराजे छत्रपती महाराणी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उदघाटन झाले. न्यू पॅलेस (नवा राजवाडा) या सुंदर वास्तूची रचना मेजर मॅन्ट या गव्हर्न्मेंट ऑफ बॉम्बेच्या इंजिनिअर, आर्किटेक्ट याने केली. इसवी सन 1877 ते 1884 या कालावधीत हा वाडा बांधून पूर्ण झाला. तत्कालीन छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या पत्नी आहिल्याबाई राणीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या राजवाड्याचे बांधकाम झाले. नव्या राजवाड्यातील संग्रहालय 12 दालनांत विभागले आहे.

Back to top button