म’श्वरमधील व्यावसायिकावर हनीट्रॅप की ब्लॅकमेलिंग? | पुढारी

म’श्वरमधील व्यावसायिकावर हनीट्रॅप की ब्लॅकमेलिंग?

महाबळेश्वर/प्रतापगड ; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक असलेल्या एका माजी नगरसेवकाला ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. आता हा हनीट्रॅपच होता की ब्लॅकमेलिंग? याची चर्चा सुरु आहे. हे प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी व्यावसायिकाच्याबाजूने शहरातील प्रतिष्ठीत लोकं उभी राहिली अन् हे प्रकरण तेथेच मिटलं. पोलिसांनी हे प्रकरण हाताळताना योग्य ती काळजी न घेतल्याने प्रतिष्ठीत व्यक्तीस लाखो रुपयांना लुटण्यात पुण्यातील संबंधित महिला यशस्वी झाली.

काही लाख रुपये दिल्यानंतर मात्र हे प्रकरण मिटवण्यात आले. यावेळी संबंधित महिलेकडून काहीही तक्रार नसल्याचे लेखी घेण्यातही आले मात्र काही लाखाच्या या समेटात काही धेंडे वाटेकरी होते? त्याचीही शहरात आता जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिक माहिती अशी, पुण्यातील एका महिलेने महाबळेश्वर येथील एका इसमास फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या इसमाने प्रथम दुर्लक्ष केले तेव्हा महिलेने पुुन्हा रिक्वेस्ट पाठवली. यावेळी इसमाने ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि मग त्यांच्यात रोजच चॅटींग सुरू झाले. काही दिवसांच्या चॅटींगनंतर त्यांची पुण्यात एका रेस्टॉरंटमध्ये भेट झाली. ओळख वाढली व काही दिवसांनी ती महिला थेट महाबळेश्वर येथे आली. तो इसम म्हणजे महाबळेश्वरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी होता.

त्याने त्या महिलेची भेट घेवून एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत चहा घेतला व पुन्हा तो इसम आपल्या ऑफिसमध्ये परत आला. थोड्या वेळानंतर त्या महिलेने संबंधित इसमाला वारंवार फोन सुरू केला व तिने ‘तू माझा विनयभंग केला आहेस व तू माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केला आहे, अशी मी पोलिसात तक्रार करणार आहे. मी पोलिसात जावू नये, असे तुला वाटत असेल तर तू मला एका ठिकाणी भेट. नाहीतर परिणाम गंभीर होतील’, असा इशारा दिला.

महिलेने हा दम देताच महाबळेश्वरातील त्या इसमाची भंबेरी उडाली. त्याने याबाबत आपल्या काही मित्रांबरोबर चर्चा केली. ती महिला पुन्हा वारंवार फोन करू लागली व धमकी देवू लागली. त्यामुळे संबंधित इसम आता पुरता घाबरला. त्याने महिलेची भेट घेण्याचे कबूल करत तिला थेट घरीच बोलावले. त्याअगोदर घरातील व्यक्तींना घडलेली सत्य घटना सांगून टाकली. घरी जावून त्या महिलेने इसमाच्या पत्नीची व मुलाची भेट घेतली. तिने तेथेही तीच धमकी दिली.

तो इसम म्हणाला, मी तुम्हाला काही केले नाही, उगीचच माझ्यावर आरोप का करता? परंतु, त्या महिलेने पुन्हा पोलिस ठाण्यात जाण्याची धमकी दिली. ती महिला पोलिस ठाण्यात गेली परंतु, तिने कोणतीही तक्रार दिली नाही. दरम्यान, मित्रांबरोबर चर्चा झाल्यानंतर व तिला घरी बोलावण्याअगोदर त्या इसमाने पोलिस निरीक्षक यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली. त्यांच्या सांगण्यावरून महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला. पोलिसांनी या तक्रारीला गांभिर्याने घेतले नाही. ती तक्रार दाखलच केली नाही व त्याची चौकशीही केली नाही.

दुसर्‍या दिवशी पुन्हा सकाळपासून त्या महिलेने महाबळेश्वरातील त्या इसमाला फोन करून धमकी देण्यास सुरूवात केली. यावेळी तिने वाई येथील एका संघटनेचे काही पदाधिकारी सोबत आणले होते. तेव्हा इसमाचे काही मित्र त्या महिलेला भेटले. या भेटीत त्या महिलेने तक्रार नको असेल तर मला पैसे हवे आहेत, असे सांगितले.

तेव्हा थोडी रक्कम महिलेला देण्याची इसमाच्या मित्रांनी तयारी दाखवली. तेव्हा त्या महिलेने मोठ्या रक्कमेची मागणी केली आणि बैठक फिस्कटली. पुन्हा महिलेचे फोन सुरू झाले. इसम काही प्रतिसाद देत नाही, हे पाहून ती महिला प्रथम वाई येथील एका संघटनेचे प्रतिनिधी घेऊन थेट पोलिस ठाण्यात गेली. तेथे तक्रार दिली. परंतू तक्रार दाखल करण्याबाबत तिनेच पोलिसांना थांबण्यास सांगितले होते.

पोलिसांकडे आता दोन्ही बाजुच्या तक्रारी होत्या. महिलेने त्या इसमासोबत काढलेला सेल्फी पोलिसांना दाखवला तर इसमाने ती महिला धमकी देत असल्याचे व पैशाची मागणी करत असल्याचे फोन रेकॉर्ड वाजवून त्याने दाखवले. मात्र, पोलिसांनी कोणतीच तक्रार दाखल केली नाही. हे प्रकरण मिटवण्यासाठी वाईतील व्यक्तीला पाचारण केले. सायंकाळी तो आला. त्याने पोलिस निरीक्षक, महिला, इसमाचे मित्र यांच्या बरोबर वेगवेगळया बैठका घेतल्या.

महिलेच्या तक्रारीला जामिन मिळणार नाही, सहा महिने आत रहावे लागेल, असे त्या इसमाला सांगण्यात आले. महिला सातत्याने फोन करून धमकी देत होती, पैशाची मागणी करत होती. हे पुरावे असतानाही तो इसम व त्याचे कुटूंब घाबरले आणि ती महिला मागणी करत असलेली रक्कम देण्यास तो इसम अखेर तयार झाला. मग कोणाला किती याची यादी तयार करण्यात आली आणि हे प्रकरण मिटवण्यात आले.

पत्रकारांना या प्रकरणाची खबर मिळाली. त्यांनी संबंधित इसमाची भेट घेवून सर्व हकीकत ऐकली. या प्रकरणातील महिलेचीही पत्रकारांनी भेट घेतली व तिची बाजुही ऐकली. नंतर या प्रकरणाच्या तडजोडीच्या बैठका झाल्या. हे प्रकरण सुरू होते तेव्हा पत्रकारांनी पोलिस निरीक्षक यांची भेट घेवून हे प्रकरण गांभिर्याने हाताळा ब्लॅकमेल करणार्‍या महिलेपासून काहीही दोष नसलेल्या इसमास संरक्षण द्या, अशी मागणी केली. महिलेने इसमाच्या मध्यस्थांकडे केलेल्या पैशाच्या मागणीचे रेकॉर्डींग उपलब्ध असताना पोलिसांनी या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून महिलेला ब्लॅकमेलिंग करण्यास मदत केली, असा आरोप आता शहरातून होत आहे.

का वागले असतील बरे असे पोलिस….

महाबळेश्वरातील हनीट्रॅप संदर्भात काही नागरिकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून या प्रकरणाची माहिती दिली व प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु जिल्हा पोलिस अधिक्षकांनीदेखील हे प्रकरण गांभिर्याने घेतले नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. संबंधित इसमाविरोधात माझी काही तक्रार नाही व मी पुन्हा कोणत्याही प्रकारे या इसमाला त्रास देणार नाही व कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार करणार नाही, असे पोलिसांनी महिलेकडून लेखी घेतले व त्या इसमाकडून या प्रकरणात माझी काही तक्रार नाही, असे लेखी घेवून पोलिसांनी हे प्रकरण अखेर बंद केले. दरम्यान, अनेक वेळा महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यासाठी आलेल्या लोकांच्या तक्रारीच दाखल करण्यात येत नाहीत. बाहेरच्या बाहेर त्या मॅनेज होतात. पोलिस निरीक्षकांबाबत अनेक तक्रारी असूनदेखील वरिष्ठांकडून मात्र याबाबत दुर्लक्षच करण्यात येत आहे.

Back to top button