कराड : नदीत बुडून युवकाचा मृत्यू; चचेगाव येथील घटना | पुढारी

कराड : नदीत बुडून युवकाचा मृत्यू; चचेगाव येथील घटना

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड तालुक्यातील कुसूर येथील युवकाचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. चचेगाव जुनेगावठाण परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ बुधवारी (दि. 2) सायंकाळी ही दुर्घटना घडली. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर युवकाचा मृतदेह सापडला.

दरम्यान संबंधित युवकाला पोहायला येत नसल्यामुळे हातपाय धुवायला गेल्यावर पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली अशी चर्चा घटनास्थळी होती. अक्षय हनुमंत पाटील ( वय २५, रा. कुसुर, ता. कराड) असे नदीत बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अक्षय पाटील हा कराड परिसरात कंत्राटदारांकडून मिळालेली ड्रेनेजसह विविध कामे करत होता. बुधवारी सांयकाळी पाच वाजता मलकापुरातील काम अटोपून तो कुसुर येथे गावी जाण्यासाठी निघाला होता. जाताजाता मित्राला फोन केला. मित्राचे चचेगाव येथील जुनेगावठाण परिसरात नदिपात्रालगत काम सुरू असल्याचे सांगितले. तो त्याला भेटण्यासाठी चचेगाव येथील कोयना नदीपात्राकडे गेला. मलकापुरातील कामावर काम करून आल्यामुळे नदीपात्रात हातपाय धुवून येतो असे म्हणून नदीपात्राकडे गेला. हातपाय धुताना पाय घसरून नदीपात्रात पडला.

पोहायला येत नसल्यामुळे पात्रतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही खबर मित्राने चचेगावसह नातेवाईकांना दिली. घटनेची माहिती मिळताच चचेगावचे पोलीस पाटील प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी दिपक दवंडे यांच्यासह कोळे पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बुधवारी सायंकाळी अंधार पडेपर्यंत शोधाशोध केली, मात्र मृतदेह सापडला नाही. गुरूवारी सकाळी पुन्हा पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर अक्षयचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

Back to top button