सातारा : राजधानीत छत्रपतींचे वादळ : अलोट उत्साहात शिवजयंती | पुढारी

सातारा : राजधानीत छत्रपतींचे वादळ : अलोट उत्साहात शिवजयंती

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राजधानी सातार्‍यासह अवघ्या जिल्ह्यात यंदा शिवजयंती अमाप उत्साहात साजरी झाली. चौका-चौकांत उभारलेल्या भगव्या स्वागत कमानी, भगव्या पताका, भगवे फेटेधारी शिवमावळे, भगवे झेंडे घेऊन शिवज्योतीबरोबर धावणारे शिवभक्त अशा भारावलेल्या वातावरणामुळे शाहूनगरीत (सातारा) तर अक्षरश: भगवे वादळ उठले. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा जयघोषांनी अवघा आसमंत दुमदुमला. सातार्‍यात शिवतीर्थावर आसमंत उजळून टाकणार्‍या रोषणाईच्या साक्षीने छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते महाआरती करत शिवरायांना मानवंदना देण्यात आली. राजधानी सातारा, किल्ले प्रतापगडसह अवघ्या जिल्ह्यात शिवजयंती थाटामाटात साजरी झाली.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंतीच्या उत्साहावर मर्यादा आल्या होत्या. यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे सार्‍यांनाच मनासारखी शिवजयंती साजरी करायला मिळाली. ‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ असेच चित्र पाहायला मिळाले. जल्लोषात शिवजयंती साजरी करत गावोगावच्या शिवमावळ्यांनी दोन वर्षांची कसर भरून काढली. सातार्‍यातील पोवई नाक्यावर असणार्‍या शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवप्रेमींनी (सातारा) रात्री 12 च्या ठोक्याला अभिवादन करून शिवजयंतीच्या महोत्सवास प्रारंभ झाला.

राजवाडा तसेच पोवई नाक्यावरील (सातारा)  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. किल्ले अजिंक्यतारा येथून पोवई नाका येथे शिवज्योत आणण्यात आली. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर शिवप्रेमींची रिघ लागली होती. सायंकाळी येथे महाआरती करण्यात आली. प्रारंभी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण पोवईनाका शिवप्रेमींच्या गर्दीने ओसंडून वाहिला. दरम्यान, (सातारा)  जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल, आ. शिवेंद्रराजे भोसले, श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्यासह हजारो शिवप्रेमींनी शिवतीर्थ व राजवाडा येथे येऊन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) सतीश धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह कार्यालयातील विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

  • साक्री तालुक्यातील आजगे दाम्पत्याला राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्कार
    शहरात अनेक ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन, शिवजन्म, आदी शिवकालावर आधारित चित्रांचे फलक झळकत होते. राजवाडा येथे सातारा नगरपालिकेच्यावतीने (सातारा)  महालाची भव्य प्रतिकृती उभारुन आकर्षक सजावट केली होती. तेथे राजघराण्यातील सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. किल्ले प्रतापगड येथे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी झाली.

शहरासह जिल्ह्यात (सातारा)  विविध सार्वजनिक मंडळांनी राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, वैराटगड, सिंहगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड, विशाळगड, मुरुड-जंजिरा, सज्जनगड, पुरंदर यासह शिवस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांवरून शिवज्योत दौडींचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ठिकठिकाणी विधायक उपक्रमही पार पडले. शिवपराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे, व्याख्याने यासह विविध सामाजिक उपक्रम थाटात राबवण्यात आले. जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पाहा व्हिडिओ :

                                                                                                                         छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीमुळे झाला मुंबईचा विकास

हेही वाचलत का ? 

Back to top button