आ. प्रवीण दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे | पुढारी

आ. प्रवीण दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकरी संकटात असताना सरकार मॉलमध्ये वाईन सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. वाईन उद्योगात कोण कोण आहे? हे सरकार धनदांडग्यांचे आहे. संवेदनशीलता हरवल्याने सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणण्यात मोलाचे योगदान देणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रावर महाविकास आघाडी सरकारकडून अन्याय झाला आहे, असा हल्‍लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आ. दरेकर सोमवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. त्यावेळी सातार्‍यात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत या सरकारचे सातार्‍याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सरकारची निर्मिती करण्यात मोठे योगदान असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्राला झुकते माप दिल्याचे दिसत नाही. साखर कारखानदारी ही मक्‍तेदारी असल्याचा अविर्भाव आणणार्‍यांसमोर कारखानदारीची वाताहत होत आहे. साखर कारखाने सुरू करण्याबाबत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचे पॅकेज, योजनांचा दिलासा दिला नाही. कारखाना कुणाचा आहे त्यापेक्षा त्यावर ऊस उत्पादक अवलंबून असतात याचा विचार केला पाहिजे.

आ. प्रवीण दरेकर म्हणाले, जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बर्‍याच योजना बंद आहेत. त्यासाठी अंमलबजावणी करणार्‍या सहायक संस्था निकष डावलून नेमल्या आहेत. सक्षम संस्थांना डावलण्याचे काम झाले आहे. त्याच्या चौकशीची मागणी अधिवेशनात करणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत वशिलेबाजी झाली आहे. एकंदर हे राज्य सरकार असून नसल्यासारखे आहे.सरकार धनदांडग्यासाठी, रेस्टॉरंट बारवाल्यांसाठी, पब सेंटर्सवाले, वाईन उद्योगासाठी काम करत आहे.

भारताने राफेल खरेदी केली त्याच किंमतीत इंडोनेशियाने भारतापेक्षा संख्येने जादा राफेल विमानांची खरेदी केली असून हा मुद्दा चर्चेला आला आहे, असे विचारले असता प्रविण दरेकर म्हणाले, पंतप्रधान आणि केंद्र शासनाने यासंदर्भात पूर्वीच माहिती दिली आहे. इंडोनेशियात काय झाले यापेक्षा महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरु आहे, त्यावर काँग्रेसने बोलावे.

ते पुढे म्हणाले, किरीट सोमय्या यांनी राज्यातील घोटाळे मुद्देसूदपणे बाहेर काढले आहेत. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप चुकीचे असतील तर त्यांना न्यायालयात खेचा, गुन्हे दाखल करा. भाजप पदाधिकार्‍यांची वाईन शॉप असतील तर ती बंद करु. संबंधित पदाधिकार्‍यांची नावे द्या, वरिष्ठांशी बोलतो, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे साडेतीन नेते लवकरच जेलची हवा खाणार आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे, असे विचारल्यावर आ. प्रविण दरेकर म्हणाले, ते रोज स्फोट करत असतात मात्र त्यात गौप्य असं गोपनीय काहीच नसतं. स्फोट झाल्यावर फुसका बार होता हे तुम्हाला कळेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, राजू भोसले, धनंजय जांभळे, विकास गोसावी, सुवर्णादेवी पाटील आदि उपस्थित होते.

Back to top button