Sangli Lok Sabha : सांगलीचा तिढा आता दिल्ली दरबारी: …तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची तयारी; विश्वजीत कदम  | पुढारी

Sangli Lok Sabha : सांगलीचा तिढा आता दिल्ली दरबारी: ...तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची तयारी; विश्वजीत कदम 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रीय आघाडी समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक यांची दिल्लीत भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर केला असला तरी या जागेवरील तिढा अजूनही सुटला नाही. कुठल्याही परिस्थितीत  सांगली लोकसभा लढवायचीच, अशा भूमिकेत काँग्रेस पक्ष आहे. वेळ पडल्यास मैत्रीपूर्ण लढतीचीही तयारी काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून वादंग होऊ शकते. Sangli Lok Sabha

…तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी : विश्वजीत कदम

काँग्रेस पक्षाला, काँग्रेस पक्ष नेतृत्वाला आम्ही आमची भूमिका कळवली आहे. पक्ष नेतृत्व आमच्या भूमिकेचा आणि भावनेचा विचार करेल, अशी अपेक्षा आहे. अखेरच्या क्षणी मैत्रीपूर्ण लढत करायची झाली तरी त्यासाठी आमची तयारी आहे. पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल, त्या पद्धतीने पुढे जाऊ असे विश्वजीत कदम म्हणाले. हे सांगताना सांगलीच्या जागेवरील दावा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, वेळ आली तर शिवसेना ठाकरे गटाला आव्हान देण्याची तयारी आहे, असे सुतोवाच विश्वजीत कदम यांनी केले. Sangli Lok Sabha

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात आणि देशात सर्वच पक्ष उमेदवार निश्चितीसाठी घाई करत आहेत. अशातच आज सकाळी उद्धव ठाकरेंनी आपल्या सतरा जागांवरील उमेदवार जाहीर केले. त्यात सांगलीतुन चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत आधीच सांगलीच्या जागेवरून वाद असताना शिवसेनेने एकतर्फी उमेदवारी घोषित केली. त्यामुळे काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नाराजी व्यक्त केली.

बुधवारी सकाळी सांगलीतुन चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होताच विश्वजित कदमांनी दिल्ली गाठली. आणि काँग्रेस नेत्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडले. विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरील विषय सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचवला असल्याचे सांगितले. विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी भेट झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, “सांगलीच्या जागेसंदर्भात आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक यांची भेट घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढण्याचा आपला निर्धार आहे. अगदी सुरुवातीपासून म्हणजे १९४७ पासुन ते २०१४ पर्यंत काँग्रेस पक्षाने सांगलीची जागा लढवली आहे.

आज परिस्थितीत सांगली लोकसभेत काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक असे तीन आमदार आहेत. गावागावांमध्ये विविध स्तरावर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधित्व करत आहेत. सांगली लोकसभेचे वातावरण काँग्रेसमय आहे. त्यामुळे सांगली लोकसभेतून विशाल पाटलांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आग्रही आहोत, हीच भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. यापूर्वीही ही भूमिका कळवली आहे. तयारीच्या दृष्टीने विविध उपक्रम, कार्यक्रम सांगली जिल्ह्यात अनेक दिवसापासुन सुरू आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या य़ांच्यासह राज्यातील प्रमुख नेते सांगलीमध्ये आलेले आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाची जाहीर झालेली यादी ही केवळ ठाकरे गटाची आहे. महाविकास आघाडी म्हणून ही यादी जाहीर झालेली आहे, असे वाटत नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी तसेच नेते आमची बाजु समजुन घेवुन या संदर्भात उद्धव ठाकरेंशी संवाद साधतील, अशी अपेक्षा आहे.  चंद्रहार पाटील आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, उत्तम पैलवान आहेत. मात्र राजकारण, समाजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत.” असेही विश्वजीत कदम यावेळी बोलताना म्हणाले.

Sangli Lok Sabha : हे मी ‘पुढारी’वर सांगितले… विश्वजीत कदम

‘पुढारी’वर दिलेल्या मुलाखतीत मी हे स्पष्टपणे सांगितले की, “कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाला सांगली असे कधाही ठरले नव्हते. कोल्हापूरची उमेदवारी शाहू महाराजांना द्यायची असे ठरले होते. शाहू महाराज जो पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा द्यायची असे ठरले होते. त्यात शाहू महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडला. त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाला सांगली द्यायची असे कधीच ठरले नव्हते.”  असे म्हणत त्यांनी पुढारी न्युजला दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला.

  देर है, अंधेर नही :  विशाल पाटील

ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अशी आहे ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र लढणार आहे. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ही कदाचित अशा पद्धतीने तडजोड करण्याची पद्धत असेल. सांगलीसोबत आणखी दोन-तीन जागा अशा आहेत ज्यामध्ये तडजोड झालेली नाही. हे आम्ही प्रत्येक नेत्याशी बोलून माहिती घेतली आहे.

सध्या जे काही चालले आहे ती कदाचित शिवसेनेची तडजोडीची पद्धत असेल. काँग्रेस जबाबदार पक्ष आहे. यातून काँग्रेस पक्ष निश्चितपणे मार्ग काढेल. यापूर्वीही आणि यापुढेही आम्ही विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात आमच्या जिल्ह्यात निवडणुका लढलेल्या आहेत आणि लढू. पक्ष ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने पुढे जाऊ. मग ती लढत मैत्रीपूर्ण असेल, अमैत्रीपूर्ण असेल पूर्ण असेल किंवा जी असेल ती असेल, त्याला आमची तयारी आहे.” असे म्हणत सांगली लोकसभेसाठी कुठल्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायचीच याबद्दल सुतोवाच काँग्रेसचे प्रस्तावित उमेदवार विशाल पाटलांनी केले.

काँग्रेस पक्षासाठी काम करत असताना अगदी स्वातंत्र्यकाळापासून वसंतदादा पाटील यांच्यापासून आम्ही काम केले आहे. राज्यात, देशात सत्ता यावी यासाठी आम्ही कायमच पक्षाचे काम केले आहे. कधीतरी थांबावे लागले म्हणून पक्ष विरोधी काम करणे किंवा विरोधी पक्षात जाणे अशा चुकीच्या गोष्टी आम्ही केलेल्या नाही आणि ते बरोबर नाही. पक्षावर आमचा पूर्ण विश्वास आहे.” असेही विशाल पाटील दिल्लीत बोलताना म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button