काहीही झाले तरी सांगली लोकसभा मतदारसंघावरील हक्क सोडणार नाही : विश्वजित कदम | पुढारी

काहीही झाले तरी सांगली लोकसभा मतदारसंघावरील हक्क सोडणार नाही : विश्वजित कदम

सांगली; पुढारी वृत्तसेवा : काहीही झाले तरी काँग्रेस सांगली लोकसभा मतदारसंघावरील आपला हक्क सोडणार नाही. शिवसेनेने आघाडी धर्माचे पालन करावे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले. ‘पुढारी न्यूज’ला त्यांनी सोमवारी खास मुलाखत दिली. त्यात त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच हवी, असे ठासून सांगितले.

ते म्हणाले, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे नेहमीच काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे. त्यामुळे आता जी काही चर्चा सुरू आहे, ती चुकीची आहे. सांगलीची जागा काँग्रेसची आहे. ती आमच्याकडेच राहावी हा हट्ट आम्ही सोडणार नाही. शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा व या जागेबाबत वाद वाढवू नये. मिरज येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर कदम यांनी शिवसेनेलाही सुनावले. त्यामुळे ते विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसून आले. कोल्हापूरची जागा काँग्रेसला म्हणून सांगली शिवसेनेला असे काहीही ठरले नाही. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसने माघार घेणे आम्हाला अमान्य आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.

Back to top button