Sangli News : देवराष्ट्रेत तरुणाला मारहाण; प्रचंड तणाव | पुढारी

Sangli News : देवराष्ट्रेत तरुणाला मारहाण; प्रचंड तणाव

देवराष्ट्रे; पुढारी वृत्तसेवा : येथे सोमवारी रात्री गावामध्ये बाहेरून येऊन वास्तव्य करीत असलेल्या एका समाजातील तरुणांनी गावातील गणेश साठे या युवकास दुचाकी गाडी खरेदी व्यवहारावरून तलवार, लाठ्यांनी जोरदार मारहाण केली. काही महिन्यांपासून या तरुणांचे सातत्याने होणारे वाद यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले असतानाच, साठे याला झालेल्या मारहाणीमुळे रात्री दहाच्या सुमारास संपूर्ण गाव एकत्र आले होते. (Sangli News)

मंगळवारी सकाळी गाव बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेकडो तरुण व महिलांनी रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायतीसमोर रस्त्यावर ठिय्या मारलेला होता. यामुळे दिवसभर गावात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले होते. गावात सोमवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.

याबाबत माहिती अशी : साठे याने गावातीलच एका व्यक्तीची दुचाकी गाडी खरेदी केली होती. यावरून गावात काही दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या समाजातील तरुणांनी साठे याला छत्रपती संभाजी महाराज चौक येथे तलवार, लाठ्यांनी जोरदार मारहाण केली. यामध्ये साठे जखमी झाला आहे. (Sangli News)

या समाजातील तरुणांची गावात काही महिन्यांपासून सातत्याने वादावादी व तंटे होत आहेत. मुलींच्या छेडछाडीच्या घटनाही घडल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी हायस्कूलच्या परिसरामध्ये जोरदार भांडणे झाली होती. बाहेरून येऊन तरुण गावात दादागिरी करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष होता. साठेला झालेल्या मारहाणीमुळे गावात संतापाची लाट तयार झाली. सर्व गाव एकत्र येऊन या लोकांना गावाबाहेर काढण्याचा निर्णय झाला. मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांनी फौजफाटा बोलावून बंदोबस्त लावला होता. मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. यामध्ये गाव बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, निवासी नायब तहसीलदार विलास भिसे यांनी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. त्यामुळे पाच वाजता शेकडो तरुण व महिलांनी ग्रामपंचायतीसमोर रस्त्यावर बैठक मारून रस्ता जाम केला होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत लोक रस्त्यावर बसून होते. त्यानंतर रात्री उशिरा चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे गावात दिवसभर तणाव होता.

हेही वाचा :

Back to top button