छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन स्पा सेंटरवर पोलिस उपायुक्त नवनीत काॅंवत यांच्या पथकाने छापे मारले. तेथून स्थानिकसह परराज्यातील एकूण १३ तरुणींची सुटका केली. तसेच रोकड, देहविक्रीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. ३० जानेवारीला रात्री ७ वाजता एन-३ आणि आकाशवाणी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुंडलिकनगर आणि जिन्सी ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती, अशी माहिती उपायुक्त काँवत यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी सिडको ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने एन-७ भागातील तांबट एज्युकेशनच्या बिल्डींगमध्ये छापा मारून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर काँवत यांच्या पथकाने बीड बायपासवरील सेनानगरात छापा मारून कुख्यात तुषार राजपूतचा हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय अड्डा उद्ध्वस्त केला होता. दरम्यान, शहरात ५० एजंट कार्यरत असल्याची माहिती तपासातून समोर आली. तेथेच स्पा सेंटरच्या आडून वेश्या व्यवसाय चालत असल्याची खबर काँवत यांना मिळाली होती. त्याआधारे सापळ्याचे नियोजन केले. सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, पुंडलिकनगरचे निरीक्षक राजेश यादव, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक सुरेश जारवाल, संदीप काळे, आनंद बनसोडे, निसार शेख, नंदकुमार भंडारे, सहायक उपनिरीक्षक विलास वैष्णव, अंमलदार गणेश डोईफोडे, दिगंबर राठोड, विशाखा तुपे, अभय भालेराव यांच्या पथकाने एन-3 येथील रॉयल ओक स्पामध्ये डमी ग्राहक पाठविला. त्याच्या इशाऱ्यानुसार छापा मारला. तेथे १० खोल्या आढळल्या. खोलीत मसाजसाठीचे सर्व साहित्य, वॉश बेसिन, काही खोल्यांमध्ये बाथ टब, कंडोमची पाकिटे आढळून आली. त्यावरून तेथे वेश्या व्यवसाय चालू असल्याचे दिसून आले. तेथून पाच तरुणींची सुटका करण्यात आली. यात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि म्यानमारच्या तरुणी असल्याचे समोर आले.
रॉयल ओक स्पाच्या व्यवस्थापक तरुणीने अथर्व स्पा मध्येही असाच वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पथकाने लगेचच जालना रोडवरील अथर्व स्पामध्ये छापा मारला. तेथे ९ खोल्या आढळल्या. प्रत्येक खोलीत बेड, वॉश बेसिन, बाथरूम होते. तेथून स्थानिकच्या आठ तरुणींची सुटका करण्यात आली. तेथील व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. तेथील रजिस्टरवर ३० जानेवारीला १३ ग्राहक येऊन गेल्याची नोंद होती. त्यांच्याकडून २९ हजार ८०० रुपये आल्याचेही व्यवस्थापकाने पोलिसांना सांगितले.
स्पा सेंटरवर कारवाई करण्यापूर्वी नवनीत काँवत यांनी अधिकाऱ्यांना उपायुक्त कार्यालयात बोलावून घेतले. तेथे त्यांचे मोबाइल जमा करायला लावले. त्यानंतर त्यांना राॅयल ओक स्पा सेंटरवर छापा मारायला पाठविले. तेथेच अथर्व स्पा सेंटरची माहिती मिळाल्यावर पथक पुढील कारवाईला गेले. डीसीपींनी कोणालाही या कारवाईची साधी कुणकुणदेखील लागू दिली नाही.