छत्रपती संभाजीनगर : आदर्श घोटाळा प्रकरणात आणखी एक प्रकरण; महिला नागरी पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : आदर्श घोटाळा प्रकरणात आणखी एक प्रकरण; महिला नागरी पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आदर्श समुहातील घोटाळा प्रकरणात आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी मानकापे परिवारासह १९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी सिडको ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी सात प्रकरणात विनातारण कॅश क्रेडिट कर्ज वाटप करून ते वसूल न करता रिव्हर्स एन्ट्री मारून हा अपहार केल्याचे लेखा परिक्षणातून समोर आले आहे.

आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणात ११ जुलै २०२३ रोजी पहिले दोन गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून मानकापे कुटुंबातील एक मुलगा वगळता सर्वजण जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणात सहावा गुन्हा दाखल झाला आहे. अमानउल्ला हामेदखाँन पठाण (५२) हे फिर्यादी आहेत. त्यांना पतसंस्थेने ठराव घेऊन लेखापरिक्षण करून देण्यासाठी नियुक्त केले होते. त्यांनी २०२२ ते २०२३ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. त्याचा अहवाल १६ ऑक्टोबर २०२३ रोजी संस्थेला तर २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला आहे. संस्थेच्या मुख्यालयासह चार शाखांच्या व्यवस्थापकांकडे आलेल्या कर्ज मागणी अर्जांची पाहणी केल्यावर अध्यक्षा विनता पाटील, मुख्य व्यवस्थापक अशोक मुगदळ आणि उर्वरित चारही शाखांच्या व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांनी सात कर्जदारांचे खाते थकीत दिसू नये म्हणून कॅश क्रेडिट खात्यात ३१ मार्च २०२३ रोजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थोच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करून एकत्रितरित्या कर्जाचा भरणा करून घेतला, असे समोर आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुप्रिया केंद्रे करीत आहेत.

आदर्श समुहाला बोगस कर्ज वाटप

आदर्श बिल्डर्स व डेव्हलपर्सला १ कोटी ८५ लाख, आदर्श ऑईल मिलला १६ लाख ४५ हजार, समृद्धी किराणा स्टोअर्सला ६ लाख ५७ हजार, आदर्श डेअरीला १६ लाख ४३ हजार, आदर्श ऑटो सर्व्हिसेसला २१ लाख ९१ हजार, न्यू श्रीराम इलेक्ट्रिकलला २१ लाख ९१ हजार, आदर्श आॅइल मिलला १४ लाख ७९ हजार रुपये विनातारण कर्ज वाटप केले. धक्कादायक म्हणजे, या सर्व संस्था आदर्श समुहाच्या आहेत. या प्रत्येक संस्थेत अध्यक्ष, संचालक म्हणून मानकापे कुटुंबातील लोक आहेत. त्यांनी ज्या उद्देशासाठी कर्ज घेतले त्यासाठी न वापरता अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महिला नागरी पतसंस्थेची अध्यक्षा वनिता सुनील पाटील, मुख्य व्यवस्थापक अशोक श्रीपतराव मुगदळ, शाखा व्यवस्थापक जगदीश सोमनाथ कुलीअप्पा, हारुबाई अशोक खानापुरे, राजेंद्र भिकनराव मते, कविता प्रकाश तुपे यांच्यासह अंबादास पाटील, अनिल अंबादास पाटील, सुनील अंबादास पाटील, सविता देविदास आधाने, रेणुका किशोर मोगल, पुष्पाबाई नामदेव कचकुरे, नलिनी चंदुलाल बाहेती, सुनंदा भाऊसाहेब मोगल, सिंधू दादाराव इंगळे, वैशाली विलास चिंतामणी, शोभा शिवाजी कदम, लता अरूण टाक, शीतल दिनेश चव्हाण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

आदर्श घोटाळा २८० कोटींचा

१) आदर्श नागरी पतसंस्था – २ गुन्हे : 202 कोटींचा घोटाळा

२) औरंगाबाद जिल्हा कृषी सहकारी संस्थांचा संघ – १ गुन्हा : ३ कोटींचा अपहार

३) जय किसान जिनिंग अँड प्रेसिंग – १ गुन्हा : ३६ कोटींचा अपहार

४) आदर्श महिला नागरी सहकारी बँक – १ गुन्हा – ३५ कोटींचा घोटाळा

५) आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था- १ गुन्हा : ४ कोटींचा अपहार

रिव्हर्स एन्ट्री मारून घाेटाळा

आरोपींनी घोटाळा कसा केला हे फिर्यादीत नमूद केले आहे. आदर्श मिलच्या खात्यावर ३१ मार्च २०२२ रोजी ४ लाख येणे बाकी होते. ही रक्कम त्याच दिवशी एका खात्यामार्फत जमा घेऊन थकबाकी कमी करण्यात आली आणि येणे असलेली बाकी त्याच तारखेस कर्जदाराच्या नावे दिली. म्हणजे, येणे रक्कम बाकी राहिली. ही रक्कम कर्जदाराकडून वसूल न करता रिव्हर्स एन्ट्री घेऊन विनातारण कमी करून रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट होते, असे लेखापरीक्षणातून समोर आले.

हेही वाचा

Back to top button