रेल्वे सुरक्षा दलात ‘ट्रॅकर’ श्वानच नाही! | पुढारी

रेल्वे सुरक्षा दलात ‘ट्रॅकर’ श्वानच नाही!

स्वप्निल पाटील

मिरज : रेल्वेत तसेच स्थानकात होणार्‍या चोरीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांची उकल करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे ट्रॅकर श्वानच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेत चोर्‍यांच्या घटनांत वाढ झाली आहे. मिरज आणि पुणे स्थानकात चोर शोधक श्वान पुरविण्याकडे रेल्वेने कानाडोळा केल्याने चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान रेल्वे सुरक्षा दलासमोर उभे ठाकले आहे.

मिरज रेल्वे जंक्शन हे मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाला जोडणारे महत्त्वाचे जंक्शन आहे. दक्षिण आणि उत्तर भारतात धावणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या मिरज, पुणेमार्गे धावतात. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमध्ये अनेक चोरीच्या घटना देखील घडत असतात. पुणेखालोखाल मिरज जंक्शन हे संवेदनक्षम जंक्शन आहे. कर्नाटकातून हद्दपार करण्यात आलेल्या अनेक गुन्हेगारांनी मिरजेतील जंक्शनजवळच असणार्‍या या परिसरात आश्रय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रेल्वेत तसेच स्थानकात छोट्या-मोठ्या चोरीच्या कारवाया करण्यात येत असतात. तसेच गेल्यावर्षी रेल्वे वॅगनमधून इंधन चोरीची देखील घटना घडली होती. परंतु या घटनांचा माग काढण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे ट्रॅकर श्वानच नसल्याने माग काढण्यात अडथळे येत आहेत. मिरज आणि पुणे जंक्शनच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा दलाकडे बॉम्ब आणि अमली पदार्थ शोधक श्वान आहेत. मिरजेत श्वान पथकाची स्थापना केल्यापासून ट्रॅकर श्वानाची मागणी आहे, तर गेल्या दोन वर्षापासून पुणे सुरक्षा दलाकडे देखील ट्रॅकर श्वान नसल्याचे सांगण्यात आले. ट्रॅकर श्वानच नसतील तर सुरक्षा दलाचे जवान चोरट्यांचा माग काढणार कसा, असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे कोल्हापूर ते सातारापर्यंतच्या स्थानकांची जबाबदारी आहे. यादरम्यान रेल्वेत छोट्या, मोठ्या अनेक चोरीच्या घटना तसेच रेल्वे स्थानकासह रेल्वेचे साहित्य, सिग्नल वायर, दुहेरीकरणासाठी आणि विद्युतीकरणासाठी ठेवण्यात आलेले साहित्य चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु घटनास्थळावरून चोरट्यांचा माग काढण्यासाठी लागणार्‍या ट्रॅकर श्वानासाठी ज्या त्या जिल्ह्यातील जिल्हा श्वान पथकावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु जिल्हा श्वान पथकाकडून वेळेत श्वान उपलब्ध होत नसल्याने चोरट्यांचा माग काढणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येते.

तसेच मिरजेत असणार्‍या श्वान पथकाला अत्याधुनिक केनल मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 70 लाखाचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. परंतु याबाबत रेल्वेकडून कोणत्याही हालचाली सुरू असल्याचे दिसून येत नाही. अत्याधुनिक केनल नसल्याने फलाट क्रमांक सहाजवळ असणार्‍या एका कॉटर्समध्ये बॉम्ब शोधणार्‍या दोन लॅब्राडोर आणि अमली पदार्थ शोधणार्‍या एका बेल्जीयन मॅनेलॉईस श्वानाला आश्रय घ्यावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मिरज रेल्वे सुरक्षा दलाला सध्या डॉबरमॅन जातीच्या ट्रॅकर श्वानाची नितांत गरज आहे. मिरजेत ट्रॅकर श्वान उपलब्ध झाल्यास कोल्हापूर ते सातारा स्थानकात होणार्‍या चोरीच्या घटनांची उकल करणे रेल्वे सुरक्षा दलाला सहजशक्य होणार आहे. तसेच बॉम्ब, अमली पदार्थ शोधक श्वानांनंतर ट्रॅकर श्वान देखील सुरक्षा दलाला मिळाल्यास महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असणारे मिरज जंक्शन सुरक्षेच्यादृष्टीने एक सुसज्ज श्वानपथकयुक्त होणार आहे. त्यामुळे रेल्वेकडून तातडीने मिरजेत ट्रॅकर श्वान देण्याची गरज आहे.

बेवारस साहित्य ठेवणार्‍यांचा देखील निघणार माग

मिरज रेल्वे स्थानकात अनेकवेळा प्रवाशांकडून तसेच संशयितांकडून बॅग ठेवण्यात येते. स्थानकात बेवारस बॅग आढळून आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाची एकच तारांबळ उडते. बॉम्बशोधक श्वानाकडून फक्त बॅगेची तपासणी करण्यात येते. परंतु ती बॅग ठेवणार्‍या व्यक्तीचा माग काढता येत नव्हता. परंतु ट्रॅकर श्वान मिळाल्यानंतर संशयित बॅग ठेवणार्‍या व्यक्तीपर्यंत देखील सुरक्षा दलास पोहोचण्यास मदत होणार आहे.

पुणे विभागाला होणार फायदा

मुंबईतील मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील म्हणाले, पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरजमार्गे धावणार्‍या रेल्वे गाड्यांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर चोरीच्या घटनांत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे चोर शोधणारे ‘ट्रॅकर’ श्वान तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे. मिरजेला ट्रॅकर श्वान मिळाल्यास याचा पुणे विभागाला निश्चितच फायदा होणार आहे.

‘पुढारी’च्या मागणीला आले होते यश
मिरज जंक्शन हे संवेदनाक्षम असल्याने तसेच येथून अमली पदार्थाची तस्करी होत असल्याने मिरज सुरक्षा दलास अमली पदार्थ शोधक श्वान मिळावा, असे वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची तातडीने दखल घेऊन रेल्वेकडून बेल्जीयन मॅनेलॉईज हे अमली पदार्थ शोधक श्वान दिले होते. हे श्वान मिरजेत आल्यामुळे कोल्हापूर ते सातारादरम्यान एकही अमली पदार्थ तस्करीची घटना घडलेली नाही. त्यामुळे अमली पदार्थ शोधक श्वानाची मोठी मदत सुरक्षा दलाला झालेली आहे.

Back to top button