दोन पालकमंत्र्यांच्या बेफिकिरीने कृष्णा कोरडी | पुढारी

दोन पालकमंत्र्यांच्या बेफिकिरीने कृष्णा कोरडी

शशिकांत शिंदे

सांगली : कृष्णा नदीतील पाणी पातळी आणि होणारा उपसा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी दहा दिवसांपूर्वी केली. पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी दोन्ही पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत, मात्र पाणी सोडण्याबाबत अद्यापही कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या बेफिकीर धोरणामुळे कृष्णा कोरडी पडू लागली आहे.

दरम्यान, पाणी नसल्याने नदीकाठावरील योजना ठप्प झाल्या आहेत. ऐन दसरा, दिवाळीच्या सणात पाणी नसल्याने शेतकरी, नागरिक हैराण झाले आहेत. दुसर्‍या बाजूला लोकांना कसे तोंड द्यायचे या चिंतेने पाटबंधारे विभागाचे अधिकारी हतबल झाले आहेत.

यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यातच कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. गेल्यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले होते. तरी सुद्धा उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी उपसा बंदी करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली. पावसाळ्यात नदीचे पात्र कोरडे पडले होते. गणपती विसर्जनावेळीही नदीत फार कमी पाणीसाठा होता.

त्यावेळी जोरदार वादंग झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून 1050 क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर काही दिवसातच पाणी थांबवण्यात आले.

सध्या ऑक्टोबर हीट असल्याने पिकासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे नदीतून पाणी उपशासाठी मागणी वाढत आहे. अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडत आहे. पात्र कोरडे पडल्याने बहुतेक पाणी योजनाही ठप्प झाल्या आहेत. काही ठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ पात्रातील खोलगट भागात पाईपचा फुटव्हॉल्व्ह ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

दुसर्‍या बाजूला पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. पाण्याविना पिके दुपार धरू लागली आहेत. पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना तगादा लावला जात आहे. पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या येथील अधिकार्‍यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी, तोंडी मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. याबाबत एका अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

मात्र सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची पाण्यासाठी परवानगी अद्याप मिळाली नाही. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक होऊन त्यात पाणी सोडण्याचा निर्णय आणि वर्षभरातील पाणी सोडण्याचे नियोजन होणार आहे. मात्र बैठक घेण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.

सांगलीस दोन दिवस पुरेल एवढेच पाणी

येथील कृष्णा नदीपात्रात सांगली शहराला दोन दिवस पुरेल इतपतच पाणी साठा आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसानंतर शहरात पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शेरीनाल्याचे पाणी या पाण्यात मिसळून साथीचे आजार वाढण्याचा धोकाही आहे.

‘डीपीडीसी’त चर्चा होऊनही दखल नाही

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी कृष्णेतील पाण्याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्याची अद्याप दखल घेतली नाही.

मला 29 तारखेपर्यंत वेळ नाही

काही लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांना नदीत पाणी सोडण्याची मागणी केली असता, मला आता 29 तारखेपर्यंत वेळ नाही. त्यानंतर बघू , असे सांगण्यात आले. त्यामुळे कालवा समितीची बैठक होणार कधी आणि पाणी सोडण्याचा निर्णय होणार कधी तसेच नागरिकांच्या रोषाला कसे सामोरे जायचे, असे प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पडले आहेत. पाणी सोडण्यासंदर्भात दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button