सांगली : गटातटाची समीकरणेच ठरवणार आमदार | पुढारी

सांगली : गटातटाची समीकरणेच ठरवणार आमदार

विजय लाळे

विटा :  राष्ट्रवादीच्या फुटीमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्या बंडामुळे अनेक शक्यतांची नव्याने मांडणीची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत 1999 चीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात खानापूर आणि आटपाडी तालुके तसेच तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलातील 21 गावांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभेला एकूण 3 लाख 22 हजार मतदार होते. शिवसेनेचे आ. अनिलराव बाबर यांनी अपक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यापेक्षा 26 हजारांहून अधिक मताधिक्क्य घेत विजय मिळवला. ही लढत एकास एक होती.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी काँग्रेसकडून सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीकडून अमरसिंह देशमुख, शिवसेनेकडून अनिल बाबर रिंगणात होते. त्यावेळी बाबर यांना 72 हजार 849 मते मिळाली. एकूण मतांच्या टक्केवारीपैकी त्यांना 33.40 टक्के मते होती. काँग्रेसच्या पाटील यांना 53 हजार 52 म्हणजे 24.33 टक्के मते मिळाली. भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 44 हजार 419 मते म्हणजे 20.37 टक्के मते मिळाली. राष्ट्रवादीकडून उभे असलेले देशमुख यांना 39 हजार 725 मते म्हणजे 18.21 टक्के मते मिळाली. 19 हजार 797 मताधिक्क्यांनी बाबर विजयी झाले होते. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत सदाशिवराव पाटील विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनिल बाबर यांच्या विरोधात दोन्ही वेळेस 15 हजारांहून अधिक मताधिक्क्य घेतले. मात्र 1999 ची निवडणूक आमदार बाबर यांनी समोर तगडा विरोधक नसल्याने एकहाती जिंकली.

मतदारसंघाचा एकूणच इतिहास पाहिला तर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांमधील कोणाचा गट प्रबळ आहे, त्यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. कुठलेही दोन किंवा अधिक गट एकत्र आल्यास यशाचे पारडे त्यांच्या बाजूने झुकते. आमदार बाबर यांचा, माजी आमदार पाटील यांचा खानापूर, आटपाडी तालुके आणि विसापूर मंडलात स्वतंत्र गट आहे. पडळकर यांच्या व्यक्तिगत करिश्मामुळे तिन्ही ठिकाणी त्यांना मानणारा वर्ग आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत झालेली फूट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारा आ. बाबर यांचा सत्तेतील समावेश आणि आता राष्ट्रवादीत पडलेली फूट व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून झालेला समावेश यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलू लागली आहेत.

भाजपमध्ये आ. गोपीचंद पडळकर आणि आटपाडीचा देशमुख गटाचा समावेश आहे. आमदार बाबर शिंदे गटात आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील सध्यातरी मूळ राष्ट्रवादीसोबत आहेत. मात्र त्यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या कोअर टीममध्ये अजित पवार यांच्याबरोबर गेल्यास आपल्याला पालिकेच्या कामात आणि विकासकामे करण्यासाठी मदत होईल, अशी चर्चा सुरू आहे. दिवाळीपूर्वी किंवा नंतर विटा पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आ. बाबर यांनी त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांची फळी आणि शहरात विकासकामांचा धडाका दोन- अडीच वर्षांपासूनच सुरू आहे. अशा स्थितीत पाटील गटाला पालिका निवडणूक म्हणावी तितकी सोपी जाणारी नाही. त्याचवेळी आटपाडीतील देशमुख आणि पडळकर गट आ. बाबर यांच्या काही वर्षांच्या कार्यपद्धतीवरून नाराज आहेत.

आ. पडळकर यांनी आतापर्यंत झाले तितके पुरे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरिष्ठांना सांगून तुम्हाला हिसका दाखवू, अशी भाषा आ. बाबर यांच्या समोरच भाषणात केली. शिवाय जिल्हा बँकेच्या आणि माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर देशमुख गटातही आ. बाबर यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी आहे.

बाबर यांनी माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांना सोयीस्कर भूमिका घेतली, असा देशमुख गटाचा आक्षेप आहे. शिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही आ. बाबर यांनी माणगंगा कारखाना निवडणूक प्रकरणात फसवले आहे, असा आरोपही देशमुख गटाचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पालिका निवडणूक पाटील गटाला आणि आमदारकीची निवडणूक बाबर गटाला जड जाणार, अशी चर्चा आहे. त्यामुळेच अजित पवारांबरोबर गेल्यास पाटील गटाला पालिका फायदा मिळेल, असा कार्यकर्त्यांचा मानस आहे.

2024 मध्ये आ. बाबर यांनाच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीच्यावतीने पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. पाटील गट अजित पवार बरोबर गेल्यास महायुती म्हणून भाजपचे देशमुख आणि पडळकर गटाबरोबर विट्याच्या पाटील गटालाही आ. बाबर यांना पूरक भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा तगड्या विरोधकाच्या अभावी 1999 चीच पुनरावृत्ती होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

शिंदे गट अपात्र झाल्यास स्थिती बदलणार

नजीकच्या काळात जर शिंदे गटाच्या अपात्रतेच्या विषयावर काय होणार, राष्ट्रवादीतील फूट खरी अथवा बनाव (जसे बोलले जाते की, ही शरद पवारांचीच एक चाल आहे) आहे का ? याची उत्तरे काळाच्या पोटात दडलेली आहेत. लवकरच ती बाहेर येतील आणि पुन्हा गृहीतके बदलून राजकीय परिस्थिती नव्याने मांडली जाऊ शकते.

Back to top button