सांगली : बळीराजाची धडधड वाढली | पुढारी

सांगली : बळीराजाची धडधड वाढली

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  मान्सून लांबला आहे. कोयना, धोम, कण्हेर, चांदोली धरणांत अत्यल्प पाणीसाठा आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना बंद केल्या आहेत. कृष्णा काठावर उपसा बंदी लादली आहे. विहिरी, कूपनलिकांची पातळी खालावली आहे. पाऊस पडणार की नाही, उपसा बंदी किती दिवस चालणार तसेच पिके वाळण्याच्या व उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची धडधड वाढली आहे. तसेच कोयनेतील पाणीसाठा संपुष्टात आल्यास वीजनिर्मितीही ठप्प होण्याची शक्यता आहे.

मागील चार वर्षांपासून मान्सून लांबत चालला आहे. पाऊस महिनाभर उशिरा येत आहे. यामुळे खरीप हंगामावर परिणाम होत आहे. त्यानंतर अतिवृष्टी होते. यात पिकांचे नुकसान होते. यंदाही तशीच अवस्था दिसत आहे. हिवाळ्यात सतत पाऊस पडला. पण जून महिना संपत आला तरी अद्यापही मान्सूनचा पत्ता नाही. महापुराच्या धास्तीने जलसंपदा विभागाने कोयना, चांदोली धरणातील पाणी सिंचन, पिण्यासाठी तसेच कर्नाटकला मोठ्या प्रमाणात सोडले. त्यात यंदा कमाल तापमान सरासरी 41 व किमान 35 अंश सेल्सिअस राहिल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले. यामुळे धरणे, तलाव, विहिरींची पाणी पातळी घटली.

जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोयना, धोम, कण्हेर, चांदोली धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या असलेल्या पाण्यापैकी निम्मा साठा मृतसंचय आहे. यामुळे हे पाणी वापरता येऊ शकणार नाही. तसेच जिल्ह्यातील तलाव, विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. यामुळे टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी जलसंपदा विभागाने कृष्णा काठावर पाणी उपसा बंदी लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात चार दिवस त्यानंतर टप्प्या-टप्प्याने ती वाढविण्यात येणार आहे. मध्येच केवळ तीन-चार दिवस वीज पुरवठा सुरळीत करून सिंचन योजना सुरू करण्यात येणार आहेत. पण पिकांची पाण्याची तहान यामुळे भागणार नाही. अनेक शेतकर्‍यांचा पाण्याचा एक फेराही पूर्ण होणार नाही. याचा फटका प्रामुख्याने ऊस, भाजीपाला, केळी, आगाप टोकणी केलेले सोयाबीन या पिकांना बसू लागला आहे. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील नदीकाठच्या गावांतील हजारो एकरांवरील पिके यामुळे धोक्यात आली आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना बंद केल्याने कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यातील तगलेली पिके होरपळण्याची शक्यता आहे.

उसाची आडसाली लागण ठप्प

दरवर्षी उन्हाळी पाऊस होतात. यामुळे खरीप हंगामासाठी शेतीची मशागत केली जाते. पण यंदा पाऊस लांबला आहे. शेतकर्‍यांनी पेरणी, टोकणी करण्याचे टाळले आहे. वाळवा तालुक्यात केवळ 350 हेक्टरवर उसाची आडसाली लागण झाली आहे. उर्वरित तालुक्यात लावणी ठप्प आहेत.

बियाणे, खतांची उलाढाल ठप्प

खरीप हंगामात खते, बियाणे, औषधांची उलाढाल वाढते; पण पावसाने ओढ दिल्याने या बाजारपेठची उलाढाल ठप्प झाली आहे.

महापुराबाबत काम करणार्‍या काही सामाजिक संस्थांनी पाणी सोडण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढविला. यामुळे धरणांतील साठा संपत चालला आहे. जलसंपदा विभागाने दोन महिन्यापूर्वी नियोजन करून कृष्णेत कमी प्रमाणात पाणी सोडले असते तर ही वेळ आली नसती. आता किमान आठवडाभर तरी उपसा बंदी रद्द करावी. मंगळवारी पूर्ण वीज द्यावी. यामुळे किमान पाण्याचा एक फेरा पूर्ण होऊन पिके वाचतील. त्यानंतर चार दिवस उपसा बंदी करावी.
– सुनील फराटे, पदाधिकारी, शेतकरी संघटना

Back to top button