राहुल गांधी यांना झालेली शिक्षा योग्यच : रामदास आठवले | पुढारी

राहुल गांधी यांना झालेली शिक्षा योग्यच : रामदास आठवले

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राहुल गांधींनी सर्व मोदी चोर आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यांच्याविरोधात मोदी नावाच्या व्यक्तीने खटला दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांची खासदारकीही रद्द झाली. त्यामुळे कायद्यापेक्षा कोणीही व्यक्ती मोठी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राहुल गांधी यांना झालेली शिक्षा ही योग्यच आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.

मंत्री आठवले म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्व  समाजाला न्याय मिळाला आहे. अर्थसंकल्पात
विकासासाठी तरतूद करून विकास करीत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतही पुन्हा एनडीएच सत्तेवर येईल. शरद पवारांनी नागालँडमध्ये एनडीएला साथ दिली आहे. त्यांनीही एनडीएत सहभागी होऊन सत्तेत यावे. काँग्रेस पक्षात नाराजी आहे. आतून ती खिळखिळी झालेली आहे. राहुल गांधींनी देशाचा दौरा केला. परंतु त्याचे मतात परिवर्तन होणार नाही.

उद्धव ठाकरे यांनी आता शिवगर्जना पक्ष काढावा

महाराष्ट्र सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले, शिंदे-फडणवीस यांचे सरकार चांगले चालले आहे. मुळात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा परिणाम म्हणून सर्व लोक त्यांना सोडून गेले. त्यांच्याकडून पक्षही गेला. त्यामुळे त्यांनी आता शिवसेनाऐवजी शिवगर्जना पक्षा काढून सर्वत्र गर्जना करीत फिरावे. शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच जबाबदार आहेत.

राज ठाकरे महायुतीत नको

मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्याप्रमाणात गर्दी असते. परंतु त्या गर्दीचे रुपांतर मतात होताना दिसत नाही. त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा मुद्दा घेत आहेत. याला आमचा विरोध आहे. त्यांनी मंदिरावर भोंगे लावण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. महायुतीत रिपाई, शिवसेना, भाजप हे सक्षम आहे. त्यामुळे त्यांची गरज नाही. त्यांना आमचा विरोध असेल.

लोकसभेसाठी शिर्डीतून इच्छुक

आठवले म्हणाले, देशात आमचा पक्ष वाढत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे. यासंदर्भात मोदी-शहा यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.

Back to top button