इस्लामपूर : जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

इस्लामपूर : जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील अपघातातील जखमी जवान शेखर बाळासाहेब कदम (वय 26, सध्या रा. इस्लामपूर, मूळ गाव-मसुचीवाडी, ता. वाळवा) यांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर पुणे येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी शेखर यांचे पार्थिव मसुचीवाडी येथे आणण्यात येणार आहे. शेखर आणि त्यांचा मित्र प्रथमेश लोखंडे यांच्या दुचाकीचा बुधवारी अपघात झाला होता. अपघातात प्रथमेश लोखंडे यांचा मृत्यू झाला होता.

शेखर कदम हे त्यांच्या कुटुंबासह इस्लामपुरातील क्रांतिसिंह नगरमध्ये रहात होते. काही दिवसापूर्वी शेखर कदम आणि त्यांचा लष्करातील मित्र प्रथमेश लोखंडे हे दोघेजण सुट्टीवर आले होते. बुधवारी रात्री वाघवाडी फाट्यावरून प्रथमेश लोखंडे आणि शेखर कदम हे दुचाकी (एम.एच.10/डीके-7353) ने इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीने कारला धडक दिली. या अपघातात दोघेजण उडून रस्त्यावर पडले. लोखंडे यांच्या डोक्याला, मानेला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेखर कदम यांच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुणे येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेखर कदम यांच्या पश्चात आई, पत्नी, आठ महिन्याचा मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मंगळवारी मसुचीवाडी येथे कदम त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Back to top button