सांगली : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा; दाम्पत्यावर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

आटपाडी: पुढारी वृत्तसेवा : आटपाडी शहरातील एका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र म्हणून जादूटोणा करण्यात आला. या प्रकरणी आटपाडीतील दाम्पत्यावर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. संजय दादा गेळे व अश्विनी संजय गेळे (आटपाडी) अशी त्यांची नावे आहेत. अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.१९) दुपारी आटपाडी येथील निंबवडे येथील रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाचे नातेवाईक असल्याचे खोटी माहिती देऊन या दाम्पत्याने प्रवेश केला. यावेळी रुग्ण सोनाली शिवदास जिरे (रा. मापटेमळा, आटपाडी) हिच्या कपाळावरून बोटे फिरवत टॅबमधील मजकूर वाचून शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवून जादूटोणा व भोंदूगिरी केली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने आटपाडी तालुक्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

दरम्यान, आटपाडी मध्ये मागील तीन वर्षांपासून नियोजनबद्धपणे धर्मांतरण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, गोपनीय पद्धतीने सुरू असलेली ही मोहीम उघडकीस आली आहे. त्यामुळे या धर्मांतरण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button