सांगली : ‘सिव्हिल’मध्ये औषधांचा तुटवडा! | पुढारी

सांगली : ‘सिव्हिल’मध्ये औषधांचा तुटवडा!

सांगली; सचिन लाड : गोरगरिबांचा आधार असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या जखमेवर ड्रेसिंग करायचे साहित्य नाही. मधुमेह, रक्तदाबावरील गोळ्यांचा नेहमीच खडखडाट असतो. रुग्णांच्या नातेवाईकांना सर्रासपणे बाहेरून औषधे खरेदीसाठी चिठ्ठी दिली जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे सध्या हाल सुरू आहेत.

सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील रुग्ण येथे उपचारांसाठी दाखल होतात. येथे अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी शासनाने मंजूर केला. रुग्णालयाची टोलेजंग इमारत उभा राहिली. मात्र शासनाने औषध खरेदीसाठी निधीच वाढवून दिलेला नाही. गेल्या कित्येक वर्षापासून औषध खरेदीसाठी वर्षाला केवळ दोन कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी दाखल होतात. साडेचारशेहून अधिक रुग्णांना वार्डात दाखल करून उपचार केले जातात.

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला सातत्याने औषध टंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाने रुग्णालयात औषध दुकान सुरू केले. मात्र गोरगरीब रुग्णांना औषधे मिळावीत, यासाठी निधी वाढवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

लोकप्रतिनिधींचेही सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. खासगी रुग्णालात जाऊन उपचार करण्यासाठी ऐपत नसल्याने रुग्ण ‘सिव्हिल’मध्ये दाखल होतात. महागड्या तपासण्या करण्याची सामुग्री नाही. सीटीस्कॅन आणि एमआरआय तपासणीला एकतर मिरजेला नाही तर खासगी रुग्णालयात रुग्णांना जावावे लागत आहे. औषध टंचाईमुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना सर्रासपणे औषधे बाहेरून खरेदी करण्यासाठी चिठ्ठी जात आहे. अकस्मित दुर्घटना विभाग 24 तास सुरू असतो. सातत्याने अपघातातील जखमी रुग्ण दाखल होतात. त्यांच्या जखमेवर ड्रेसिंग करण्यासाठी साहित्य नाही. तेही बाहेर आणायला सांगितले जात आहे.

मधुमेह, रक्तदाबावरील गोळ्या नाहीत. काही सामाजिक संस्था हजार ते दीड हजाराच्या पटीत या गोळ्या देतात. मात्र त्या महिनाभरही पुरत नाहीत. अनेक आजारातील महागडी औषधे नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत.

केसपेपर विभाग अजूनही ‘ऑफलाईन’च!

‘सिव्हिल’मधील केसपेपर विभाग ‘ऑनलाईन’ केला होता. यासाठी खासगी ठेका दिला होता. मात्र हा ठेका सहा महिन्यापूर्वी संपला आहे. तेव्हापासून हा विभाग ‘ऑफलाईन’ झालेला आहे. कागदी केसपेपर दिला जात आहे. त्याचे शुल्क भरलेली पावतीही अनेकदा रुग्णांना दिला जात नाही नसल्याच्या तक्रारी आहेत.

खोकल्याचे औषध जातय तरी कुठं?

‘सिव्हिल’मध्ये खोकल्यावरील औषध गुणकारी ठरते. लाल रंगाचे पातळ औषध दिले जाते. ते घेण्यासाठी रुग्णांची नेहमीच गर्दी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे औषधही रुग्णांना मिळेनासे झाले आहे.

Back to top button