सांगली : व्यापार्‍याच्या मृत्यूचे गूढ वाढले; काहीच धागेदोरे नाहीत | पुढारी

सांगली : व्यापार्‍याच्या मृत्यूचे गूढ वाढले; काहीच धागेदोरे नाहीत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील पटेल चौकातील व्यापारी सौमित सुमेध शहा (वय 23) यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ वाढले आहे. शिरवळ पोलिसांना अजून काहीच धागेदोरे सापडले नाहीत. तांत्रिक मुद्याच्याआधारे तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.

सौमित शनिवारी व्यावसायानिमित्त मित्रांसोबत कारने पुण्याला गेले होते. मित्रांना पुण्यात एका ठिकाणी सोडून ‘मी लगेच जाऊन येतो, थोडं काम आहे’, असे सांगून तेथून ते निघाले होते. रविवारी सकाळी नीरा नदीच्या पात्रात सौमितचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मनगटी घड्याळ गायब होते.

नातेवाईकांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. विच्छेदन तपासणीत त्यांचा पाण्याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांनी त्याचदिवशी मित्रांना ‘हेल्प, हेल्प’ असा मोबाईलवर संदेश केला होता. तसेच चेन व घड्याळ गायब असल्याने त्यांचा घातपात झाल्याचा नातेवाईकांना संशय आहे. सौमितच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडूनही ठोस काहीच महिती मिळाली नाही. सौमित यांच्या मोबाईलचे ‘कॉल डिटेल्स’वरून आता तपासाला पुढील दिशा देण्यात आली आहे. पुण्यातून ते ज्या मार्गावरून शिरवळपर्यंत आले, तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले जात आहे. तांत्रिक मुद्यावरच तपासाची मदार ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button