ओला दुष्काळ जाहीर करण्यात राज्यसरकार कडून टाळाटाळ : जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | पुढारी

ओला दुष्काळ जाहीर करण्यात राज्यसरकार कडून टाळाटाळ : जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच फार मोठे नुकसान, मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्यात राज्यसरकार कडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. आटपाडी येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा आणि अभ्यास मेळाव्यात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, राज्यात ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच फार मोठे नुकसान झालं आहे, मात्र राज्यसरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. जिथं जिथं लोकांचे नुकसान झाले अश्या सर्व तालुक्यांमध्ये ओला दुष्काळाच्या उपाययोजना ताबडतोब सुरू केल्या पाहिजेत, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

गुजरात निवडणुकी संदर्भात ते म्हणले, केजरीवालांचा पक्ष आता गुजरातच्या निवडणुका लढवणार आहे, आपण हिंदू देवतांना मानतो हे दाखवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत असावेत. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे, कारण गांधींना जगमान्यता आहे. आता नोटेवर देव-देवता आणि महापुरुषांचे फोटो लावणे अश्या मागण्या पुढे येत असून त्यामुळे वाद निर्माण होतील त्यामुळे, आता जी पद्धत आहे तीच चालू ठेवणे योग्य आहे.

पुढे ते म्हणाले, आपल्या देशात आपण अनेक देवांना मानतो, गाईच्या पोटामध्ये तर ३६ कोटी देव आहेत. त्यामुळे कुठल्या देवाचा फोटो छापावा असा प्रश्न निर्माण होईल. आणि त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे केजरीवाल यांची सूचना स्वीकारणं एवढं सोपे नाही, असा टोला ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

हेही वाचा;

Back to top button