राधानगरी मतदार संघाला मंत्रिपदाच्या लाल दिव्याचे वेध..! | पुढारी

राधानगरी मतदार संघाला मंत्रिपदाच्या लाल दिव्याचे वेध..!

गुडाळ (राधानगरी, कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिल्याने नोव्हेंबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातून राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आबिटकर यांच्या रूपाने राधानगरी मतदार संघाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे पूर्वी १२ तर सध्या १० मतदार संघ आहेत. राधानगरी वगळता जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाला केव्हा ना केव्हा मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले आहे. राधानगरीला मात्र मंत्रीपदाने सातत्याने हुलकावणी दिली. ना. चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा मंत्रिपद भूषविले असले तरी त्यांनी एकदा पुणे पदवीधर तर दुसऱ्यांदा पुणे विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे.

त्यामुळे खऱ्या अर्थाने राधानगरी मतदारसंघ मंत्रिपदापासून वंचितच राहिलेला आहे. विधानसभेच्या या पंचवार्षिक मध्ये पहिल्या टप्प्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून आ. आबिटकर यांची मंत्रीपदी वर्णी लागेल अशी मतदारसंघात अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली .

त्यानंतरच्या घडामोडीत शिंदे गटात दाखल झालेल्या आबिटकर यांना मंत्रिपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे. विद्यमान मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व नसल्याने पालकमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्याकडे आहे. साहजिकच विस्तारात ना. शिंदे गटातून वर्णी लागणाऱ्या आमदारांना थेट पालकमंत्री पदाची संधी आहे. राधानगरीचा मंत्रिपदाचा बॅकलॉग यावेळी तरी भरून निघणार का? यासाठी संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे राधानगरी मतदार संघातील जनतेचे लक्ष आहे.

हेही वाचा;

Back to top button