बागलवाडी साठवण तलावाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार : जिल्हाधिकारी | पुढारी

बागलवाडी साठवण तलावाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार : जिल्हाधिकारी

जत, पुढारी वृत्तसेवा : बागलवाडी (ता. जत) अनेक वर्षापासून अपूर्ण असणाऱ्या साठवण तलावाच्या कामाला गती देणार आहे. सदरचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. भुरसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला निश्चित करून त्यांना वेळेत मोबदला देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. त्यांनी बागलवाडी तलावाच्या रखडलेल्या पाहणी केली. यावेळी बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे,लघु पाठबंधारे विभागाचे अधिकारी सुतार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जतच्या उत्तरेला कोरडा नदीवर बांधण्यात येत असलेला बागलवाडी साठवण तलाव सन २००५ दरम्यान मंजूर झाला होता. त्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. परंतु सन २००८ पासून मात्र हे रखडले आहे. या तलावामुळे बागलवाडी मोकाशेवाडी, सिंगनहळी, कासलिंगवाडी, शेगाव या भागातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहेत. सद्यस्थितीत ८० टक्के तलावाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे हे काम थांबलेले आहे. तसेच बागलवाडी येथील जवळपास शंभरहून अधिक शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नाही. सन २०१७-१८ च्या सुमारास फळझाड लागवडीच्या लाभाचा प्रश्न समोर आला. बागायती क्षेत्रानुसार लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याची चौकशी सुरू आहे. शासनाने मोबदला निश्चित करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा, या संदर्भात मागणी शेतकऱ्यांनी वारंवार केली आहे.

तलाव तातडीने पूर्ण करण्यात यावा. येथील अडचणी सोडवाव्यात यासाठी बागलवाडी, मोकाशीवाडी येथील शेतकरी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेक वेळा आंदोलन झाली आहेत. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ,ग्रामपंचायतचे ठराव घेण्यात आलेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न सुटणे अपेक्षित होते परंतु हा प्रश्न सुटलेला नाही. नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत, बुधवारी बागलवाडी गावास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व म्हणाले, “शेतकऱ्यांना जो काही मोबदला असेल तो निश्चित केला जाईल व योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यात येईल. तसेच या तलावाचे अपूर्ण कामातील अडथळे महिन्याभरात दूर करून या भागाला निश्चितपणे न्याय देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button