FIFA Women U17 World Cup : अमेरिकेकडून भारताचा 8-0 गोल फरकाने पराभव | पुढारी

FIFA Women U17 World Cup : अमेरिकेकडून भारताचा 8-0 गोल फरकाने पराभव

भुवनेश्वर, पुढारी ऑनलाईन : fifa women u17 world cup : फिफा महिला अंडर-17 विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी भारताला अमेरिकेकडून 0-8 अशा गोल फरकाने पराभव पत्करावा लागला. अ गटातील या एकतर्फी लढतीच्या पहिल्या अर्ध्या तासात भारतीय संघ चार गोलनी पिछाडीवर होता. मध्यंतरापर्यंत अमेरिकेने 5-0 अशी आघाडी घेतली. तसेच त्यांनी उत्तरार्धात आणखी तीन गोल डागून गोल आघाडी 8-0 पर्यंत वाढवली.

अमेरिकेसाठी मेलिना रेबिंबास हिने (9 व्या आणि 31 व्या मिनिटाला) दोन गोल केले. तर शार्लोट कोहेलर (15 व्या), ओनेका गेमरो (23 व्या), गिसेल थॉम्पसन (39 व्या), एला एमरी (51 व्या), टेलर सुआरेझ (59 व्या) आणि कर्णधार मिया भुटा (62 व्या) यांनी प्रत्येकी एक गोल केला. (fifa women u17 world cup india women lost their 1st match against usa)

भारताचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांनी सामन्यापूर्वी सांगितले होते की, फेब्रुवारीपासून चांगली तयारी केल्यानंतर आपल्या संघाविरुद्ध गोल करणे कठीण जाईल. सामन्यादरम्यान मात्र त्यांचे खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला कोठूनही स्पर्धा देताना दिसले नाहीत. महिला विश्वचषक स्पर्धेतील देशाचा पहिला सामना घरच्या प्रेक्षकांसमोर एक दुःस्वप्न ठरला.

यजमानपदाच्या जोरावर या वयोगटातील स्पर्धेत प्रवेश मिळवणाऱ्या भारतीय संघाला 2008 च्या पहिल्या मोसमातील उपविजेत्या संघाविरुद्धच्या खराब बचावात्मक खेळाचा फटका सहन करावा लागला. या सामन्यातील पूर्वार्धात अमेरिकेने 70 टक्के वेळ चेंडूवर नियंत्रण ठेवले. यावरून भारतीय संघाच्या खराब कामगिरीचा अंदाज लावता येतो. भारतीय संघ अमेरिकेच्या डी-मध्ये केवळ दोनदाच प्रवेश करू शकला. पण एकही फटका गोलपोस्ट भेदू शकला नाही. भारताला आता 14 ऑक्टोबरला मोरोक्को आणि 17 ऑक्टोबरला ब्राझीलविरुद्ध खेळायचे आहे.

 

Back to top button