सांगली : कडेगाव तालुक्यात 15 हजार हेक्टरवर ठिबक सिंचन | पुढारी

सांगली : कडेगाव तालुक्यात 15 हजार हेक्टरवर ठिबक सिंचन

कडेगाव; रजाअली पिरजादे :  मागील चार वर्षांत कडेगाव तालुक्यात बागायती पिकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऊस, द्राक्षे, केळी, कलिंगड या फळबागाबरोबर हळद, आले या नगदी पिकांचा यात मोठा वाटा आहे. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालही वाढली आहे.

कडेगाव तालुका दुष्काळी आणि डोंगराळी तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु टेंभू आणि ताकारी सिंचन योजनामुळे तालुक्याचा कायापालट झाला आहे. तालुक्याचे एकूण अठ्ठावन हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी पिकावू क्षेत्र 50 हजार हेक्टर आहे. ऊस पिकाचे सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्र आहे. आले व हळद नगदी पिकाचे सुमारे 1200 हेक्टर तर भाजीपालाचे सुमारे 1500 हेक्टर क्षेत्र आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर जादा करीत आहे. तालुक्यात सुमारे 15 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ठिबक सिंचनद्वारा शेती केली जात आहे. तर नामांकित कंपन्यांची खते ठिबकद्वारे पिकांना दिली जात आहेत. याचबरोबर योग्यवेळी शेती तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी शेतकरी करू लागला आहे. परिणामी एकेकाळी दुष्काळी व कुसळे पिकणार्‍या जमिनीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेताना दिसत आहे.

ताकारी योजनेमुळे तालुक्यातील सोनहिरा खोर्‍यातील तेरा गावे सुजलाम सुफलाम झाली आहेत.उरलेल्या बहुतांश गावांना आता टेंभू योजनेचे पाणी मिळू लागले आहे.त्यामुळे शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा दिला आहे. याऐवजी ऊस, भाजपाला आणि फळबागांची शेती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहेत. शेतकरी आता ऊस पिकात नवनवीन जातीचे बियाणे वापरून उत्पन्नात वाढ घेताना दिसत आहे. दुष्काळात नामशेष झालेली हळद आणि आले पीक आता पुन्हा जोर धरू लागले आहे.

 

जमिनीचा गुणधर्म

तालुक्यात हलकी, मध्यम व उच्च प्रत अशा तिन्ही प्रकारच्या जमिनी आहेत. तालुक्यात नदीच्या पाण्याच्या पुराचा धोका फार कमी प्रमाणात असल्याचा लाभ येथील शेतकर्‍यांना होताना दिसतो. येथील बहुतांश जमिनी निचर्‍याच्या असल्याने पीक उत्पादन वाढीस मोठ्या प्रमाणात मदत होताना दिसते.

ठिबक सिंचनाचा मोठा लाभ शेती पिकाला झाला आहे. ऊस व भाजीपाला पिकात आधुनिकता तसेच शेती तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरत आहे. त्यामुळे एकरी 90 ते 100 टन उसापर्यंत मजल मारता आली आहे. यापुढेही आणखी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
– सुरेश निर्मळ, प्रगतशील शेतकरी

शासनाने ठिबक सिंचनास 80 टक्के अनुदान दिले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी घेताना दिसत आहेत.जे काही उर्वरित ऊस उत्पादक व तसेच बागायतदार शेतकरी आहेत. त्यांनीही ठिबक सिंचनद्वारा शेती करावी. तालुक्यात मागील चार वर्षात पीक वाढीचा आलेख उंचावला आहे.
– बाळकृष्ण कदम, तालुका कृषी अधिकारी

Back to top button